नवी दिल्ली – आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवरील डेड स्कीनमुळे सौंदर्यात (beauty) बाधा येते. त्यामुळे आपला चेहरा काळा आणि निस्तेज दिसू लागतो. हे कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकते. डेड स्किन (dead skin) काढण्यासाठी अनेक लोक बाजारातून महागडी सौंदर्य उत्पादने आणून त्यांचा वापर करतात. पण दरवेळेस त्याचा परिणाम होईलच असे नाही. काही वेळा या उत्पादनांच्या वापरानंतरही डेड स्किन निघत नाही. त्यापेक्षा घरात उपलब्ध असणाऱ्या काही नैसर्गिक घटकांच्या मदतीने तुम्ही डेड स्कीन काढू शकता. चणाडाळीचं पीठ किंवा बेसन (besan scrub) हेही त्यापैकीच एक आहे.
बेसन हे एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. याचा वापर करून तुम्ही स्क्रब तयार करू शकता व डेड स्कीनपासून मुक्ती मिळवू शकता. घरच्या घरी तुम्ही हे कसे करू शकता, ते जाणून घेऊया.
कोरफड आणि बेसन
साहित्य – थोडं बेसन, कोरफडीचा रस किंवा जेल
कृती –
एका भांड्यात कोरफडीचा रस घ्या,त्या मध्ये बेसन मिसळा आणि या मिश्रणाने चेहरा 2 मिनिटे स्क्रब करा. हे मिश्रण चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे राहू द्यावे आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यास डेड स्किन सहजपण निघून जाईल व तुमचा चेहरा चमकदार होईल.
दही व बेसनाचा स्क्रब
साहित्य –
1 छोटा चमचा दही, चिमुटभर हळद, 1 छोटा चमचा बेसन
कृती – एका बाऊलमध्ये 1 चमचा दही, चिमुटभर हळद आणि 1 चमचा बेसन घेऊन ते नीट एकत्र करावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावून स्क्रब करावे आणि 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर हलक्या हाताने चोळून हा स्क्रब काढावा. पण हे मिश्रण चेहऱ्यावर पूर्ण वाळू देऊ नये, त्याआधी ते काढावे. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि कोरडा करा. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावू शकता, त्याने बराच फायदा होईल. डेड स्कीन हळूहळू निघून जाईल.
मध व बेसनाचा स्क्रब
साहित्य –
1 चमचा गुलाबजल
1 चमचा बेसन
1 चमचा मध
कृती –
एका बाऊलमध्ये गुलबाजस किंवा गुलाबपाणी घेऊन त्यात बेसन व मध मिसळावा. ते मिश्रण नीट एकत्र करून त्यातील गुठळ्या मोडाव्यात. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 10 ते 15 मिनिटे ठेवावे. मिश्रण वाळत आल्यानंतर पाण्याने चेहरा धुवावा. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय गुणकारी ठरतो.