Women’s Day Special : लैंगिक सुख महिलांची गरज आणि अधिकारसुद्धा

| Updated on: Jul 22, 2021 | 9:54 PM

भारतीय समाजातील स्त्रिया त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा व्यक्त करु शकतात का? तर याचं उत्तर नाही असंच दिलं जाईल, किंवा 21 व्या शतकातलं पहिलं दशक संपेपर्यंत तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच होतं.

Womens Day Special : लैंगिक सुख महिलांची गरज आणि अधिकारसुद्धा
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : भारतीय समाजातील स्त्रिया त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा व्यक्त करु शकतात का? तर याचं उत्तर नाही असंच दिलं जाईल, किंवा 21 व्या शतकातलं पहिलं दशक संपेपर्यंत तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच होतं. परंतु आता यात थोडाफार बदल होऊ लागला आहे. महिला आता कामसुखाबद्दलही बोलत आहेत. आपल्याकडे असं म्हटलं जातं की, पुरुष प्रेम करतो ते स्त्रीकडून सेक्स मिळवण्यासाठी, तर स्त्रिया सेक्स करतात ते पुरुषाकडून प्रेम मिळवण्यासाठी. यावर आपणही विश्वास ठेवत आलो आहोत. काही वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याकडे सेक्स क्लिनिक सुरु होऊ लागले, तेव्हा सुरुवातीची अनेक वर्ष कधीही कोणतीही महिला अशा क्लिनिकमध्ये गेली नाही. हे चक्र बरीच वर्ष चाललं. आता तसं चित्र राहिलं नाही. स्त्रिया स्वत: पुरुषांना घेऊन क्लिनिकमध्ये जाऊ लागल्या आहेत आणि त्यांच्या समस्या सांगू लागल्या आहेत, जसे की, त्यांचा पती प्रीमेच्यॉर इजॅक्यूलेशनसारख्या (Premature ejaculation – शीघ्रपतन) समस्येने ग्रस्त आहे. तेव्हा त्या तिथल्या डॉक्टर/सेक्सोलॉजिस्ट्सना सांगतात की, तुम्ही याच्या (त्यांच्या पतीच्या) समस्येवर उपचार करा, अन्यथा मी घटस्फोट घेईन. काही स्त्रिया सांगतात की, त्या जेव्हा कामक्रीडेचा आनंद घेत असतात तेव्हा अनेकदा क्लायमॅक्सपर्यंत (अत्युच्य आनंदाचा क्षण) पोहोचत नाहीत. स्त्रियांना आता समजलंय की, त्यांनादेखील काही सेक्शुअल अधिकार आहेत. पुरुष ते नाकारू शकत नाही. पुरुषांनी त्यांच्या या अधिकाराचा आदर केला पाहिजे. (Womens day : Sexual pleasure is also the need and right of women)

संबंधांमधून समाधान मिळायला हवं

सेक्सोलॉजिस्ट असं सांगतात की, केवळ श्रीमंत महिलांमध्ये जागरूकता आली आहे असं नाही, तर उलट निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय किंवा खेड्यांतील स्त्रियादेखील जागरुक झाल्या आहेत, कारण त्यांच्याकडे करमणुकीच्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे त्या सेक्सचा आनंद उत्तमपणे घेण्यासाठी अधिक उत्सुक असतात. परंतु हा बदल अजूनही खूपच कमी प्रमाणात आहे. आपल्याकडे असं विचारलं जातं की, सेक्सबद्दल आपल्याकडे इतकं अज्ञान आहे, लोकांच्या मनात गोंधळ आहे, तरीदेखील देशात इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं जन्माला का येतात? यावर सेक्सोलॉजिस्ट म्हणतात की, मुलं असणे आणि नात्यात समाधान असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ही गोष्ट त्यांना एकत्र ठेवू शकत नाही. पुरुष हा स्त्रिला उत्तेजित न करतादेखील तिला गर्भवती करु शकतो. वास्तविकता अशी आहे की, प्लेजर (सुख, आनंद) दोन कानांच्या मधे आहे, दोन पायांच्या मधे नाही. पुरुषाकडून कामसुख मिळवणं हा स्त्रीचा अधिकार आहे, तसंच ते सुख स्त्रीला देणं ही पुरुषाची जबाबदारी आहे. जर स्त्रीला हा आनंद मिळाला नाही तर ती तिच्या कामात लक्ष केंद्रित करू शकणार नाही. तिची चिडचिड होते.

लैंगिक शिक्षण गरजेचं

वात्स्यानाने कामसूत्रात असे लिहिले आहे की जर एखादा पुरुष एखाद्या स्त्रीबरोबर सहवास करण्यास योग्य नसल्यास त्याने इतर मार्गांनी तिला समाधानी ठेवलं पाहीजे. स्त्रियांच्या गरजा समजण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे. त्याच वेळी, स्त्रियांनी त्यांच्या जोडीदारास त्यांच्या इच्छेबद्दलदेखील सांगितले पाहिजे. यासाठी दोघेही सेक्शुअली शिक्षित असणं गरजेचं आहे.

पॉर्न फिल्म्समधील विकृती स्वीकारणं घात

अनेक पुरुषांमध्ये कामसुखाबाबत बरंच अज्ञान असतं, अशा वेळी हे पुरुष पॉर्न फिल्म्स पाहतात आणि त्यातली विकृती स्वीकारतात. तसंच अशी विकृती त्यांच्या पार्टनरला स्वीकारायला लावतात, त्यासाठी तिच्यावर दबाव आणतात. पॉर्न फिल्म्स या एखाद्या धारदार चाकूसारख्या आहेत. चाकू जसा एखाद्या सर्जनच्या हातात असतो, तेव्हा तो त्या चाकूच्या सहाय्याने एखाद्याचा जीव वाचवू शकतो, परंतु जर तोच चाकू एखाद्या खुन्याच्या हातात असेल तर, त्या चाकूने एखाद्याचा जीव जाऊ शकतो. पॉर्न फिल्म्सचं अगदी तसंच आहे. यातून लोकांमध्ये जागरुकता पसरण्याऐवजी अज्ञान आणि विकृती पसरते. बरेच पुरुष त्यातली विकृती स्वीकारतात. कोणतीही प्रौढ स्त्री किंवा पुरुष स्वतःहून पॉर्न फिल्म पाहात असेल तर ठिक आहे. केवळ उत्तेजना मिळवण्यासाठी ते अशा फिल्म्स पाहात असतील तर त्यावर हरकत घेण्यासारखं काहीच नाही. परंतु या फिल्म्स पाहून जर अनेकजण तसंच काही करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा यामुळे बलात्कारासारख्या घटना घडणार असतील, त्या वाढणार असतील तर ते खूप घातक आहे.

शारीरिक सुखाबद्दल लोक, समाज आणि सरकारही निरुत्साही

ज्या देशात कामसूत्राची रचना करण्यात आली त्या देशात सेक्सचा प्रश्न एक टॅबू बनला आहे. आपल्या देशात काही मोजक्या रुग्णालयांमध्ये लैंगिक आरोग्य विभाग आहेत. सरळ शब्दांत सांगायचे तर सरकार आणि समाजाने या प्रकरणाला कधीच गांभीर्याने पाहिले नाही. हेच कारण आहे की, लोकदेखील याबद्दल फारसे संवेदनशील नसतात. जेव्हा एखादा पुरुष त्याच्या पत्नीला लैंगिक सुख देण्यात कमी पडत असेल किंवा तिच्या शारीरिक आणि मानसिक गरजा पूर्ण करत नसेल, तेव्हा ती स्त्री त्याला सोडून जाते. अशा वेळी परिस्थिती आणखी बिकट होते. त्यांचा संसारदेखील मोडतो.

महिला आता नवे प्रयोग करु लागल्या आहेत

या प्रश्नाचं उत्तर देताना एक सेक्सॉलजिस्ट म्हणाले की, “कामसूत्र निर्माण करणाऱ्या या देशातील लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही, परंतु निश्चितपणे स्वार्थ आहे.” पुरुष नेहमीच त्यांच्या इच्छा लादत असतात. स्त्रिया नेहमीच दडपल्या जातात. ज्या नात्यात दोघांच्याही आनंदाची काळजी घेतली जाते, ते नाते दहा लाख पट अधिक चांगले आहे. आतापर्यंत लैंगिक शिक्षणाअभावी आणि मागासलेपणामुळे असे घडत आले आहे की, लैंगिक संबंध हे पुरुषांकरिता एक करमणुकीचं साधन आणि समाधान मिळवण्याची गोष्ट आहे आणि महिला केवळ त्यामध्ये भागीदार होत्या. केवळ मुलं जन्माला घालणं हेच त्यांचं काम आहे, अशीच वागणूक स्त्रियांना दिली जात होती. तथापि, गेल्या 5 ते 10 वर्षात हे चित्र काहीसे बदलले आहे. आता महिलाही त्यांच्या समाधानासाठी नवीन प्रयोग करीत आहेत. तिने तिच्या शारीरिक गरजांकडेही लक्ष देणे सुरू केले आहे.

सेक्स केवळ पुरुषांच्या आनंदासाठीच केला जातो?

सेक्शुअल प्लेजरबाबत आपल्या समाजातील लोकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. पुरुषांना सातत्याने असं सांगितलं गेलं आहे की, सेक्समध्ये आनंद मिळवणं (सेक्शुअल प्लेजर) म्हणजे फक्त ‘मेल ऑरगॅझम’. यामध्ये मोठी समस्या अशी आहे की, अनेक पुरुषांना असं वाटतं की ऑरगॅझम (Orgasm) म्हणजेच इजॅक्युलेशन (Ejaculation). परमोच्च आनंदाचा क्षण आणि स्खलन या दोन गोष्टी सेमच आहेत, असं बऱ्याच पुरुषांना वाटतं. यात महिलेची गरज काय आहे, याचा विचार पुरुष करतच नाहीत. त्यांनादेखील परमोच्च सुखाचा क्षण गाठायचा आहे, त्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी पुरुषांची आहे.

फोरप्ले आणि आफ्टरप्ले महत्त्वाचे

बरेच पुरुष कामक्रीडेदरम्यान फोरप्ले आणि आफ्टरप्लेला फारसं महत्त्व देत नाहीत. परंतु स्रियांना परमोच्च सुखाच्या क्षणापर्यंत नेण्यासाठी या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. बर्‍याच स्त्रियांना असे वाटते की, लैंगिक क्रिया केवळ पुरुषांसाठी असतात, महिलांसाठी नसतात. त्यांना पुरुषांकडून क्लायमॅक्स मागण्याचा अधिकारही नाही. स्त्रिया हस्तमैथुन करून क्लायमॅक्स गाठू शकतात हेदेखील त्यांना ठाऊक नाही. जरी काही स्त्रियाना ही गोष्टी समजली असली तरी त्या ते अंगिकारत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीने हे पाप आहे. कामाची इच्छा (सेक्स) बाळगणे किंवा पुरुषांकडे तशी मागणी करणे हे पाप असल्यासारखे किंवा गुन्हा असल्यासारखे चित्र आपल्या समाजाने उभे केले आहे. बऱ्याच वेळा जेव्हा स्त्री तिच्या समाधानाची मागणी करते तेव्हा पुरुष ही गोष्ट त्यांच्या पुरुषत्वाला एक आव्हान आहे असे मानतात. ज्या देशातील महिला सॅनिटरी पॅड आणताना काळ्या पॉलिथिनमध्ये किंवा वर्तमान पत्रात गुंडाळून पॅड आणतात, त्या देशातील महिला त्यांच्या कामक्रीडेच्या इच्छेबद्दल उघडपणे बोलतील का? असा सवालही आहेच. आपल्या देशातील महिला त्यांची अंतर्वस्त्र इतर कपड्यांखाली झाकून सुकवता. इतकी भीती आणि शरम बाळगली जाते. हे चित्र हळूहळू बलतंय. परंतु त्याला आणखी काही वर्ष जाऊ द्यावी लागतील.

संबंधित बातम्या

48% ‘मॉमस्’ विवाहबाह्य संबंधात, नव्या सर्वेचा निकाल धक्कादायक, वाचा आणखी काय काय घडतंय महिलांच्या विश्वात?