स्किन केअरमध्ये मसूर डाळीचा असा करा समावेश, चेहरा बनेल चमकदार

| Updated on: Jul 10, 2023 | 6:20 PM

चेहऱ्यासाठी आपण विविध उत्पादनांचा वापर करत असतो. आपल्या घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या मसूर डाळीच्या वापरानेही त्वचेला फायदा होऊ शकतो. मसूर डाळीची पेस्ट वापरून त्वचेच्या अनेक समस्या सोडवता येतात.

स्किन केअरमध्ये मसूर डाळीचा असा करा समावेश, चेहरा बनेल चमकदार
Image Credit source: freepik
Follow us on

Masoor Dal Face Pack : आपल्याकडे दुपारच्या व रात्रीच्या जेवणात प्रामुख्याने पोळी-भाजी, वरण भात, आमटी यांचा समावेश असतो. त्यासाठी विविध डाळींचा वापर केला जातो. त्यातीलच एक असलेली मसूर डाळ (Masoor Dal) ही देखील खूप लोकप्रिय आहे. मसूराची डाळ अतिशय पौष्टिक असते. त्यापासून आपण विविध पदार्थ बनवू शकतो. प्रोटीनने (protein)युक्त असलेली ही डाळ केवळ आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेसाठी (useful for skin) देखील अतिशय फायदेशीर असते. या डाळीचा आपण त्वचेसाठी विविध प्रकारे वापर करू शकतो.

मसूर डाळीच्या वापराने पिंपल्स, डाग आणि कोरडी त्वचा अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो. या डाळीच्या पिठामध्ये मध, दूध आणि दही यांसारख्या गोष्टी मिसळून फेस पॅक कसा तयार करावा ते जाणून घेऊया.

प्रथम करा फक्त डाळीचा वापर

4 चमचे मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावून काही वेळ त्वचेला मसाज करा. 20 मिनिटांनी मसूराची पेस्ट काढून टाका व चेहरा स्वच्छ धुवा.

मसूर डाळ व दुधाचा फेसपॅक

मसूराची डाळ रात्रभर भिजवा आणि सकाळी ती बारीक वाटा. त्यामध्ये थोडे दूध घाला. मसूर डाळ आणि दुधाची ही पेस्ट त्वचेवर लावून २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. याच्या नियमित वापराने डाग दूर होण्यास मदत होईल.

मसूर डाळ आणि मध

भिजवलेल्या मसूर डाळीची पेस्ट मधीत मिसळा. त्यानंतर मध व डाळीचा हा पॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थोडा वेळ मसाज करा. १० ते २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. नियमित वापरमुळे त्वचा मऊ होते.

दही व मसूर डाळीचा पॅक

एका भांड्यात ३ चमचे मसूर डाळीची पावडर घ्या. या पावडरमध्ये थोडं दही घाला व घट्टसर पेस्ट बनवा. आता हे मिश्रण चेहऱ्याला व त्वचेला लावून हळूवार मसाज करा. ही पेस्ट 10 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या पेस्टमुळे त्वचा मुलायम होईल तसेच चेहऱ्यावरील डागही दूर होण्यास मदत होईल.

मसूर डाळ आणि कोरफड

कोरफडीचे गुणधर्म माहीत नाहीत अशी व्यक्ती विरळच असेल. ती त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरते. भिजवलेल्या मसूराच्या 2 ते 3 चमचे पेस्ट घ्या व त्यामध्ये कोरफडीचा गर किंवा जेल मिसळा. कोरफड आणि मसूराची पेस्ट ही मानेवर, चेहऱ्यावर लावून त्वचेला हलक्या हातांनी मसाज करा. साध्या पाण्याने धुण्यापूर्वी मसूराची पेस्ट त्वचेवर 20 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा व मान स्वच्छ धुवावे. नियमित वापराने तुम्हाला फरक दिसून येईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)