नवी दिल्ली : नवीन वर्षाची नुकतीच सुरुवात झाली आहे, त्यासोबतच 2019 या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवणुकीही जवळ आल्या आहेत. लोकसभा निवणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यातच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीनही राज्य काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतल्यानंतर, आता भारतीय जनता पार्टीने लोकसभा 2019 साठी कंबर कसली आहे. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रचारांची रणनीती आखत आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील 20 राज्यांत 100 सार्वजनिक सभांना संबोधीत करणार आहेत.
मोदी या सर्व सभांमध्ये केंद्र सरकारच्या कामांची माहिती देतील. येत्या गुरुवारी म्हणजेच 3 जानेवारीपासून मोदी या मिशनला सुरुवात करणार आहेत. 3 जानेवारीला पंजाबच्या जालंधर आणि गुरदासपूर येथे पंतप्रधानांची रॅली होणार आहे. 3 जानोवारीपासून भाजपच्या मिशन 2019 ची सुरुवात होणार, असे म्हटले जात आहे.
पंतप्रधान कुठे आणि कधी सभा घेणार?
3 जानेवारी : गुरदासपूर आणि जलंधर, पंजाब
4 जानेवारी : मणिपूर आणि आसाम
5 जानेवारी : झारखंड आणि ओडिशा
22 जानेवारी : वाराणसी
24 जानेवारी : कुंभ, इलाहाबाद
केंद्रीय नेतृत्व, पीएमओ आणि राज्य भाजपा नेतृत्व यांच्यात संवाद झाल्यानंतर मोदींच्या इतर सभांबाबतच्या तारखा आणि ठिकाण निश्चित होईल. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मोदींनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाच हजाराहून अधिक कार्यक्रम घेतले होते. 2014 साली भाजप ज्या जागा हरली होती, त्यावर सध्या भाजपचा फोकस आहे. यामध्ये नॉर्थ ईस्ट, दक्षिण, पश्चिम बंगाल यांसारख्या मोठ्या क्षेत्रांचा समावेश आहे.
देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मार्च-एप्रिल महिन्यात होऊ शकतात. याचे निकाल मे महिन्यापर्यंत येतील.