सोलापूर : देशाच्या स्वातंत्र लढ्यात अग्रेसर असलेला आणि देश स्वतंत्र होण्याअगोदर चार दिवस आधीच स्वातंत्र्य उपभोगलेलं शहर म्हणून सोलापूर शहराची देशभरात ओळख आहे. स्वातंत्र्य लढ्यात चार हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देणारा हा जिल्हा स्वातंत्र्यानंतरही राजकारणाच्या क्षीतिजावर ठळकपणे दिसून येतो. कारण, राज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद एकाच वेळी मिळालं होतं. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे सोलापूर जिल्हा सतत चर्चेत राहिला. मात्र 2014 च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या याच सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं आणि शिंदेंसमोर नवखे असलेले भाजपच्या शरद बनसोडे यांचा विजय झाला.
2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात काँग्रेसचा धुव्वा उडालेला असताना इकडे मोदींच्या त्या सुनामीचा चांगलाच प्रभाव पडला. आपल्या कुंडलीत पराभव नसल्याचं छातीठोकपणे सांगणाऱ्या शिंदेंच्या कुंडलीत मोदी लाटेचा शनी आला आणि त्याच्या प्रभावाने 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात कधी न पाहिलेल्या पराभवाला शिंदे सामोरे गेले. त्यावेळी देशभरात मोदी नावाचं वादळ घोंगावत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्याचा फारसा परिणाम जाणवत नव्हता. इतकंच काय, भाजपच्या उमेदवाराचा सुद्धा पत्ताच नव्हता. ऐनवेळी भाजपने नवख्या असलेल्या शरद बनसोडेंना बोहल्यावर बसविले. त्यामुळे शिंदेंच्या विजयाचा घोडा पुढे जाईल असं चित्र असतानाच निकालानंतर शिंदेंना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं.
विद्यमान खासदारांवर जनतेची नाराजी
2014 ला दीड लाखांच्या फरकाने शरद बनसोडे विजयी झाले. एकीकडे शिंदेशाही संपून भाजपच्या नव्या खासदाराची इनिंग पाहायला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लोक सज्ज झाले. सोलापुरात नव्या खासदारांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहील असं वाटत असताना साडे चार वर्षांच्या कार्यकाळात जनतेचा भ्रमनिरास झाल्याचं दिसतंय. अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळची अवस्था याचं उदाहरण आहे. हे गाव स्वतः खासदार शरद बनसोडे यांचं मूळगाव आहे. गावातील रस्ता खराब आहे. म्हणून सोलापूर महापालिकेने गेल्या वर्षभरापासून बससेवा बंद केली. त्यामुळे गावातील लोकांचे हाल होत आहेत. मात्र शरद बनसोडे हे अजूनही रस्ता होणारच असा दावा करत आहेत.
शरद बनसोडेच्या गावची ही अवस्था असेल तर त्यांच्या मतदारसंघातील काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी. एकीकडे शिंदेंचा पराभव करून शरद बनसोडेंच्या निमित्ताने लोकसभेवर कमळ फुललेलं असताना महापालिकेच्या निवडणुकीतही वर्षानुवर्षाची काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. जिल्हा परिषदेत महाआघाडी करून भाजपने सत्ता मिळवली. एकूणच भाजपच्या झंजावातामध्ये सोलापुरात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला लोकांनी भरभरून दिलं खरं, मात्र सध्याची अवस्था बघितली तर जिल्ह्यातील भाजप सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या वादात अडकली आहे. दोघात मतभेद असल्यामुळे विकासकामांना मोठा अडथळा येत आहे. हा वाद प्रदेश पातळीवर गेला. मात्र त्या दोघांमध्ये समेट घडविण्याचे प्रयत्न झाले नाही. एकीकडे या दोन मंत्र्यांचा वाद असताना दुसरीकडे खासदार शरद बनसोडेंचा मतदारसंघात म्हणावा तसा काहीच प्रभाव राहिला नाही. ठासून सांगावं असं एखादं कामही त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केलं नाही.
शरद बनसोडेंचा पत्ता कट?
आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका काही दिवसात होणार आहेत. त्या निमित्ताने मोदी-शाह जोडी कामाला लागली आहे. रोज एका ठिकाणी सभा घेऊन सरकारने केलेल्या कामाचा डांगोरा पिटवत विरोधकांवर टीकेचा भडीमार सुरु आहे. इकडे सोलापूरच्या लोकसभेचा उमेदवार कोण हे पुन्हा एकदा भाजपने गुलदस्त्यात ठेवलंय. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या कामांबाबत मतदारसंघातील लोक जसे नाराज आहेत त्याच पद्धतीने भाजपने घेतलेल्या प्रोग्रेस कार्डमध्ये शरद बनसोडेच्या कामकाजाबद्दल पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. त्यामुळे जवळजवळ त्यांचा पत्ता कट झालाय. म्हणूनच की काय नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावेळी त्यांना नियोजनापासून दूर ठेवण्यात आलं.
भाजपचेच राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांचे सोलापूर दौरे वाढले आहेत. त्यामुळे बनसोडेंचा पत्ता कट होऊन अमर साबळेची वर्णी लागते की काय अशी चर्चा आहे. इकडे भाजपचा उमेदवार ठरला नसला तरी काँग्रेसच्या गोटातही तळ्यातमळ्यात सुरु आहे. मात्र काँग्रेसपुढे सुशीलकुमार शिंदेंशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे शिंदे काँग्रेसचे उमेदवार राहणार आहेत. मात्र शिंदेचाही म्हणावा तितका मार्ग सोपा नसल्याचं राजकीय अभ्यासकांचं मत आहे. मात्र शरद बनसोडे यांच्या कामाची स्तुती करत भाजप नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत मौन बाळगलंय.
सहा विधानसभा मतदारसंघातलं चित्र
सोलापूर लोकसभा मतदार संघात असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसची सत्ता असून तिथे प्रणिती शिंदे या आमदार आहेत.
शहर उत्तर मतदारसंघात भाजपची सत्ता असून पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे इथले आमदार आहेत.
शहर दक्षिणमध्ये भाजपची सत्ता असून सहकार मंत्री सुभाष देशमुख हे इथले आमदार आहेत.
मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीची सत्ता असून रमेश कदम हे इथले आमदार आहेत.
अक्कलकोट मतदारसंघात काँग्रेसची सत्ता असून सिद्धाराम म्हेत्रे हे इथले आमदार आहेत.
पंढरपूर मतदारसंघात काँग्रेसची सत्ता असून भारत भालके हे इथले आमदार आहेत.
काँग्रेस बालेकिल्ला परत मिळवणार?
भाजपच्या खासदाराबाबत नाराजी असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या सभेमुळे उत्साह संचारलाय. कार्यकर्त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळालीय. तर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांनीही छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावत मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. लोकांना दिलेल्या आश्वासनाचं काय असा सवाल करत शिंदेंनी चक्क पंतप्रधानांवर टीका करत आपल्या प्रचाराचा रेटा सुरु ठेवलाय.
एकूणच सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा बुरुज ढासळून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपाला खासदार शरद बनसोडेंच्या कामकाजामुळे मतदारांसमोर जाताना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजप आता पुढे कशी रणनीती आखते आणि काँग्रेस आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा मिळवण्यासाठी काय करणार हे पाहणं महत्त्वाचंय.