मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. मुंबईतले सहा लोकसभा मतदारसंघ नेहमीच निर्णायक भूमिका बजावतात. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात तिरंगी लढत होऊ शकते. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. इथल्या सामजिक प्रश्नांपेक्षा इथलं जातीय समीकरणच निवडून आणण्यास कारणीभूत ठरणार आहे.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीत हेच खरे उमेदवार राजकीय पक्षांनी ठरवल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी कायम ठेवली जाऊ शकते. तर या मतदारसंघातून लढण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अगोदरच जाहीर केलंय. काँग्रेसकडून माजी खासदार एकनाथ गायकवाड प्रबळ उमेदवार मानले जातात.
याचवेळी काँग्रेस दक्षिण मध्य मुंबईत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याऐवजी वर्षा गायकवाड आणि माजी राज्यसभा खासदार भालचंद्र मुणगेकर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात विचार करत आहे. मतदारसंघात तगडी लढत होण्यासंदर्भात ही चाचपणी सुरू आहे. मात्र वर्षा गायकवाड यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास राजी नसल्याचं पक्षाला कळविले आहे. त्यामुळे एकनाथ गायकवाड यांनाच उमेदवारी मिळेल असं काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत.
दुसरीकडे एनडीएचे स्वयंघोषित उमेदवार असलेले रिपाईंचे रामदास आठवले यांनी स्वतः ची उमेदवारी घोषित केली आहे. दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात दलित, मुस्लीम मत निर्णयाक ठरू शकतं. त्यामुळे एनडीएचा उमेदवार मीचं ठरू शकतो आणि मतदार पसंतीची मते मलाच मिळतील, असा विश्वास रामदास आठवले व्यक्त करत आहेत.
शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यास त्यांना पहिल्या पसंतीची मते मिळतील असा त्यांना विश्वास वाटतो आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेची युती न झाल्यास शिवसेनेला या मतदारसंघात रामदास आठवले डोईजड उमेदवार ठरू शकतात. रामदास आठवले आणि एकनाथ गायकवाड यांच्या दलित मताची विभागणी फायदेशीर ठरतात का पाहणं गरजेचं ठरणार आहे. त्यामुळेच राहुल शेवाळे रामदास आठवले यांना उमेदवारी दिल्यानंतर शुभेच्छा देत आहेत.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात धारावी पुनर्विकास योजना, कोळीवाडा पुनर्विकास योजना, कोस्टल रोडचे प्रश्न, बीडीडी चाळ, नायगाव दादरसह मानखुर्द विभागातील प्रदूषण, माहुल गाव इथले प्रकल्पग्रस्त रहिवाशांचा विरोध हा प्रामुख्याने या निवडणुकीत प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरू शकतो. या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात लढून इथले दक्षिणातिथ्य, उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक मतं निर्णयाक ठरू शकतात.