वर्धा लोकसभा : शेतकऱ्यांच्या रोषामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

वर्धा : लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडत भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वर्ध्याचा बालेकिल्ला हस्तगत केला. आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या भाजपला मात्र गेल्या चार वर्षात आश्वासने पाळता आली नाहीत. वर्ध्यात शेतकरी हा कळीचा मुद्दा असल्याने जो तो राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या समस्यांचे […]

वर्धा लोकसभा : शेतकऱ्यांच्या रोषामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार!
Follow us on

वर्धा : लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडत भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वर्ध्याचा बालेकिल्ला हस्तगत केला. आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या भाजपला मात्र गेल्या चार वर्षात आश्वासने पाळता आली नाहीत. वर्ध्यात शेतकरी हा कळीचा मुद्दा असल्याने जो तो राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करताना दिसतोय. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या चार प्रमुख राजकीय पक्षांनी 2019 च्या लोकसभा रणसंग्रामासाठी कंबर कसली आहे. पण वर्धा जिल्ह्यात अद्याप अस्तित्व नसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून संपर्क आणि संगठन बांधणीत पुढाकार घेतला आहे. काही नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत, तर काहींनी नुसतीच चर्चा करून वातावरण तयार करायला सुरुवात केली आहे.

सर्वच पक्षांकडे इच्छुकांची गर्दी

भाजपच्या गोटात विद्यमान खासदार रामदास तडस यांची पकड घट्ट असली तरी दत्ता मेघे यांच्या कुटुंबातील सदस्य सागर मेघे (मेघे यांचा मुलगा, मागील निवडणुकीत काँग्रेसकडून लढले होते) तसेच पक्षातील नाराज असणारे मोठे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. काँग्रेसमध्ये प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांच्या नावाची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा मात्र अजूनही उमेदवाराचा शोध संपलेला नाही. शिवसेनेकडून अमरावतीमध्ये नेहमीच आपले भाग्य आजमावणारे माजी खासदार अनंत गुढे यांनी आपला मोर्चा वर्ध्याकडे वळविला असल्याचे दिसून येते . अमरावतीचा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने गुढेंनी वर्ध्यात भाग्य आजमवण्याचा बेत आखल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे.

काँग्रेसच्या चारुलता टोकस यांची ग्रामीण भागात पकड आहे. नोटाबंदी, सिलेंडर दरवाढ, जीएसटी आणि कर्जमाफी, घरकुल यांसारखे मुद्दे टोकास यांनी ग्रामीण भागात पोहोचविले. राष्ट्रवादीची कमांड सध्या वर्ध्याचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या हातात आहे. पण राष्ट्रवादीचे अनेक नेते जिल्ह्यात इतर राजकीय पक्षांच्या संपर्कात असल्याने अद्याप राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी उमेदवारच नाही. बहुजन समाज पक्षाला दर निवडणुकीत 90 हजार ते एक लाख इतके मतदान मिळत आले आहे. बऱ्याचदा बसपाची भूमिका एखाद्या उमेदवाराला विजयी करण्यास महत्त्वाची ठरली आहे.

हे मुद्दे प्रचारात गाजणार

जिल्ह्यातील सिमेंट रस्ते, समृद्धी महामार्ग, तुळजापूर मार्ग, ड्राय पोर्ट, सिंचन प्रकल्प याशिवाय वर्धा – नांदेड रेल्वे मार्ग यासारख्या विषयांना भाजपने चर्चेत आणले. पण यातील अर्धेअधिक मुद्दे काँग्रेसच्या काळातच प्रारंभ झाले होते. सेवाग्राम विकास आराखड्यासारख्या विषयात भाजपने निधीची कपात करुन गांधीवाद्यांचा हस्तक्षेपही काढून घेतला. उज्ज्वला योजनेचे सिलेंडर घेतल्यावर ग्रामीण भागातील मजुरांना ते भरण्यासाठी पैसे नाहीत. शंभराच्या वर बँका आहेत, पण शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध नाही. अशा एक ना अनेक समस्यांनी जिल्ह्यात नागरिक त्रस्त आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता भाजपने 5 लाख 37 हजार मते घेत विजय मिळवला होता. यात दत्ता मेघेंचे पुत्र सागर मेघे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. काँग्रेसला 3 लाख 21 हजार मते पडली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुबोध मोहिते हे जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काँग्रेससोबत युती होणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील सहा जागा जर स्वाभिमानीच्या वाट्याला गेल्या तर वर्ध्याची जागा स्वाभिमानीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्ह्यातील राजकीय उडी महत्त्वाची ठरत आहे.

लोकसभा निवडणूक 2014

उमेदवार  राजकीय पक्ष  मिळालेली मते    टक्के         

रामदास तडस  भाजप   537518    53.5

सागर मेघे        काँग्रेस    321735    31.75

चेतन पेंदाम     बसपा    90866     8.97

वर्धा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

वर्धा  – पंकज भोयर (भाजपा)

हिंगणघाट – समीर कुणावार (भाजपा)

देवळी-पुलगाव – रणजित कांबळे( काँग्रेस)

आर्वी – अमर काळे (काँग्रेस)

धामणगाव- चांदूर – वीरेंद्र जगताप (काँग्रेस)

मोर्शी – वरुड – अनिल बोडे (भाजपा)