चंद्रपूर लोकसभा : हंसराज अहिर यांचा बालेकिल्ला यंदाही मजबूत?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि तापमानाचे दाहक चटके देणारा राजकीयदृष्ट्या मुरब्बी जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. सर्वाधिक जमीन अधीग्रहण, गोसेखुर्दचे रखडलेपण आणि असह्य प्रदूषण ही या जिल्ह्याची दुर्दैवी ओळख. मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांनी गाजणारा-ताडोबाच्या वाघांना आश्रय देणारा […]

चंद्रपूर लोकसभा : हंसराज अहिर यांचा बालेकिल्ला यंदाही मजबूत?
Follow us on

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि तापमानाचे दाहक चटके देणारा राजकीयदृष्ट्या मुरब्बी जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. सर्वाधिक जमीन अधीग्रहण, गोसेखुर्दचे रखडलेपण आणि असह्य प्रदूषण ही या जिल्ह्याची दुर्दैवी ओळख. मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांनी गाजणारा-ताडोबाच्या वाघांना आश्रय देणारा आणि विकासाच्या वाटेवर वेगवान प्रगती करणारा हा जिल्हा आताशा रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा गृहजिल्हा म्हणून ओळखला जातो.

यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. एकीकडे चंद्रपूरचा उद्योग-प्रकल्प यांचा तोंडवळा, तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेती-शेतकरी आणि आदिवासींच्या प्रश्नांचा अस्वस्थ करणारा अध्याय. गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या अलगद झोळीत पडणारा हा मतदारसंघ भाजपने सुयोग्य मशागत करत आपल्या बाजूने वळविला. एकाच मतदारसंघात एकीकडे व्यापार-उदीम-रेल्वे यांचे जाळे, तर दुसरीकडे जिवती आणि आर्णीच्या भागातील धड रस्तेही नसणारी स्थिती. कोळसा घोटाळा उघड करणारे खासदार असा लौकिक असलेले हंसराज अहिर यांचा हा मतदारसंघ मोदी लाटेत पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने झुकला. भक्कम भाजप, एका मतदारसंघात प्रबळ असलेली शिवसेना आणि सर्वच भागात उपस्थिती असलेली, मात्र नेतृत्वहीन असलेली काँग्रेस ही या मतदारसंघाची राजकीय ओळख. गठ्ठा आदिवासी-ओबीसी मते कुणाच्या पारड्यात पडतात यावरून इथला खासदार ठरतो.

2014 च्या निवडणुकीत नेमकं काय झालं?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत या संमिश्र मतभावना असलेल्या लोकसभा मतदारसंघात मतदारांनी भाजपला कौल दिला. भाजपचे हंसराज अहिर या मतदारसंघातून 2 लाख 36 हजार 269 एवढे प्रचंड मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले. या निवडणुकीत मोदी लाट अत्यंत प्रभावी ठरली. या मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्रांपैकी राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा हे चार मतदारसंघ चंद्रपुरात, तर वणी आणि आर्णी हे यवतमाळ जिल्ह्यात येतात.

दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील विविध राजकीय समीकरणे आणि स्थानिक समाजकारण लक्षात घेता संपूर्ण लोकसभा क्षेत्रात बूथस्तरावर जो पक्ष उत्तम कामगिरी करेल त्याचा उमेदवार संसदेत धडक मारेल अशी स्थिती होती. नेमके झालेही तसेच.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळे यांचा दारुण पराभव केला. आपकडून वामनराव चटप आणि बसपाकडून हंसराज कुंभारे हे उमेदवार होते.

या मतदारसंघात मतदारांनी विकासाची आशा असल्याने काँग्रेसला नाकारत भाजपला पुन्हा एकदा संधी दिली. गेली अनेक वर्षे रेंगाळलेला गोसेखुर्द सिंचन प्रकल्प, स्थानिक आणि आदिवासी तरुणांना रोजगार, जमीन अधिग्रहितांचे बोचणारे प्रश्न, रस्ते आणि रेल्वेमार्गाचे जाळे उभारण्याची गरज यासाठी मतदारांनी भाजपला निर्णायक मतदान केलं. देशपातळीवर एकाच पक्षाला बहुमत मिळावे अशी भावना असलेल्या मूडला या चंद्रपूर मतदारसंघातील जनतेने प्राधान्य दिले. अत्यंत प्रभावी ठरलेली हंसराज अहिर यांची भ्रष्टाचारविरोधी कर्दनकाळ अशी प्रतिमा आणि खासदारकीची लख्ख कारकीर्द भाजपला विजयाच्या जवळ घेऊन गेली.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आमदार

राजुरा : संजय धोटे, भाजप

चंद्रपूर : नाना शामकुळे, भाजप

बल्लारपूर : सुधीर मुनगंटीवार, भाजप

वरोरा : बाळू धानोरकर, शिवसेना

वणी : संजीव बोदकुरवार, भाजप

आर्णी : राजू तोडसाम, भाजप

2014 मिळालेली मते

भाजप : 5 लाख 8 हजार 49

काँग्रेस : 271780

आप : 204413

बसपा : 49229

सध्या इच्छुक कोण? (प्रत्येक पक्षाकडून)

भाजप : हंसराज अहिर

काँग्रेस : नरेश पुगलिया, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, मनोहर पाऊणकर

राष्ट्रवादी काँग्रेस : राजेंद्र वैद्य

शिवसेना : आ. बाळू धानोरकर

स्थानिक पातळीवर भाजपचं वर्चस्व

भाजपचे हंसराज अहिर यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांचा मोठ्या फरकाने पराभव करत संसद गाठली. देश आणि राज्यात पाय रोवल्यावर भाजपने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या राजकारणात आपला प्रभाव वाढविण्यासाठी वेगवान आगेकूच केली. त्याचा परिणाम म्हणून या लोकसभा मतदारसंघातील चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपने सत्ता मिळविली. तर चंद्रपूर शहर महापालिका, मूल नगरपालिका, बल्लारपूर नगरपालिका, वरोरा नगर परिषद, वणी नगर परिषद आदी संस्थांवर भाजपने विजयी कामगिरी करत कमळ रोवलं. मात्र या वादळात शिवसेनेने भद्रावती नगरपालिका राखली, तर यवतमाळच्या पांढरकवडा आणि आर्णी येथे भाजपला इतर पक्षांनी शह दिला. याशिवाय लोकसभा मतदारसंघातील नगर पंचायतीदेखील भाजपने आपल्या बाजूने वळविण्यात यश प्राप्त केले. मात्र नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपला तगडे आव्हान दिले.

भाजपने दिलेले आव्हान पेलताना विरोधी पक्षांची मात्र दमछाक झाली. आधीच गटाततटात विभागलेली काँग्रेस या विरोधी पक्षाच्या भूमिकेला न्याय देऊ शकली नसल्याचे चित्र नजरेस पडले. मात्र तरीही मोदी लाटेत काँग्रेसने आपले कार्यकर्ते राखले आणि वाढविलेही. गेली चार वर्षे या मतदारसंघातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधित्वाच्या जागांवर भाजपचे वर्चस्व आहे. विद्यमान खासदार हंसराज अहिर यांची ही चौथी संसदवारी आहे. तरीही वनजमिनीचे प्रश्न, सिंचन वाढीचे प्रश्न, स्थानिक हातांना रोजगार देण्याचे मुद्दे, प्रदूषण वाढीवर लगाम, जमीन अधिग्रहण झाल्यावर शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या आणि बंद पडत चाललेले उद्योग यावर उत्तरे शोधणे खासदारांना कठीण झाले आहे.

मोदी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात रसायन मंत्रालय आणि गृहमंत्रालय यासारखे मोठे विभाग हाताळताना अहिर यांना आलेला मंत्रिपदाचा अनुभव प्रत्यक्ष विकासकामात झिरपणे शिल्लक आहे. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित शक्ती मोठा चमत्कार घडवू शकते. मात्र दोन्ही पक्ष एकत्र येणे दुर्मिळ बाब झाली आहे. याशिवाय शिवसेनेची मर्यादित शक्ती असल्याने भाजप बेरजेत सरस आहे. दोन जिल्ह्यात विभागलेल्या आणि समस्यांच्या सोडवणुकीसाठी धडाकेबाज सर्वमान्य चेहरा आवश्यक असलेल्या व्यक्तीची उणीव काँग्रेसची दुखरी बाजू आहे. मोदी लाट, त्यानंतर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविणारी विकासकामे आणि त्यातील स्थानिक खासदाराचा प्रत्यक्ष सहभाग यावर मत-मतांतरे आहेत. चार वर्षांआधी सुरु झालेली विकासकामांची मालिका अधिक ठळकपणे पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे.