हिंगोली लोकसभा मतदारसंघ : हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात यंदा 66.52 % टक्के मतदान झालं. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का जवळपास तेवढाच होता. या मतदारसंघात शिवसेनेकडून नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील तर काँग्रेसकडून माजी खासदार सुभाष वानखेडे रिंगणात पाहायला मिळाले. इथे दुहेरी लढत झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीने रंगत आणली होती. पण सुभाष वानखेडे हे शिवसेनेचे खासदार होते, त्यामुळे शिवसेनेचा पिंड असलेल्या दोन आजी माजी शिवसैनिकात ही थेट लढत झाली. त्यामुळे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आघाडीच्या सुभाष वाणखेडेंचं काम केलं, तर सुभाष वानखेडे यांची 2014 मध्ये काँग्रेसचे राजीव सातव यांच्याशी थेट लढत झाली होती.
हिंगोली लोकसभा मतदारसंघ
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | हेमंत पाटील (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | सुभाष वानखेडे (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | मोहन राठोड (VBA) | पराभूत |
2014 मध्ये सुभाष वानखेडेंना केवळ 1632 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्या निवडणुकीत राजीव सातव यांच्यावर वानखेडेंनी प्रचारादरम्यान चिखलफेक केली होती. तेच वानखेडे यंदा आयत्यावेळी काँग्रेसकडून उमेदवार घोषित करण्यात आले. त्यामुळे अनेक काँग्रेस कार्यकर्ते दुखावले होते. या निवडणुकीत राजीव सातव प्रचारार्थ सक्रिय दिसून आले नाहीत.
नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुभाष वानखेडेंना उमेदवार म्हणून स्वीकारलंच नव्हतं. अनेक कार्यकर्त्यांनी सुभाष वानखेडे यांच्याविरोधात जाऊन काम केले. वंचित फॅक्टर बराच पाहायला मिळाला.
पडद्याआडून नाराजी आणि गटातटांनी भूमिका बजावली. शिवसेनेचे वसमतचे आमदार या लोकसभेचा तिकीट मागत होते. पण त्यांना न मिळता ते हेमंत पाटलांना मिळाले. त्यामुळे ते नाराज होते. 2014 च्या निवडणुकीतील राजीव सातव यांचे विरोधक सुभाष वानखेडे यांना काँग्रेस कडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेस पक्षातील अनेक एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी नाराज होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा दिल्याचा दावा आहे.
यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य, कोणाकोणाच्या सभा
यंदाची निवडणूक ही जाती पातीवर आधारित झाली. वंचितमुळे अनेक ठिकाणी जाती जातीचे गट निर्माण झाले होते. विकासाचे मुद्दे सोडून आरोप प्रत्यारोप या निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे,धनंजय मुंडे यांच्या सभा या मतदारसंघात झाल्या.