सातारा : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली आहे. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी विजय मिळवता आला.
या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं होतं. यावेळी या मतदारसंघात 60.33 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 2014 च्या तुलनेत यावेळी 3.33 टक्क्यांनी मतदान वाढले. या मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली.
सातारा लोकसभा मतदारसंघ
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | नरेंद्र पाटील (शिवसेना) | पराभूत |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) | विजयी |
अपक्ष/इतर | सहदेव एवळे (VBA) | पराभूत |
राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर पहिल्यापासून सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली. गेल्या 2 टर्म छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून येत आहेत. ते आता तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत.
मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली, तर 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात 3.33 टक्यांनी मतदान वाढले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये 57% मतदान झाले, तर 2019 मध्ये 60.33% मतदान झाले.
सातारा लोकसभा मतदार संघाची विधानसभानिहाय मतदान आकडेवारी
वाई 1,79,935 (2014) 1,99,252 (2019)
कोरेगाव 1,51,537 (2014) 1,80,003 (2019)
कराड उत्तर 1,57,601 (2014) 1,83,280 (2019)
कराड दक्षिण 1,58,271 (2014) 1,82,372 (2019)
पाटण 1,47,024 (2014) 1,66,372 (2019)
सातारा 1,81,341 (2014) 1,98,185 (2019)
एकूण 9,76,702 (2014) 11,09,434 (2019)
विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना 2014 च्या निवडणुकीत 5 लाख 22 हजार 531 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव 1लाख 55 हजार 937 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर होते. यंदा मात्र युतीचे उमेदवार नरेंद्र पाटीलही निवडणूक मैदानात आहेत. 2019 मधील सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 38 हजार 987 मतदारांपैकी 11 लाख 9 हजार 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचे हे प्रमाण 2014 च्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढले आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे.
यंदाच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये, कुणा-कुणाच्या सभा झाल्या?
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात ‘काटे की टक्कर’ झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांच्या लढतीत मिशी आणि कॉलरचीच चर्चा रंगली. यावेळी सातारा जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी सातारा लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा, उद्धव ठाकरेंची 1 सभा आणि आदित्य ठाकरेंची 1 अशा 4 महत्वाच्या सभा झाल्या.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्वतः प्रचारसभा घेतली. यासोबतच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही भाजप-शिवसेना युतीला विरोध करणारी सभा घेत अप्रत्यक्षपणे उदयनराजेंनाच मदत केली.
प्रचारसभांमधील आरोप-प्रत्यारोप
विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी 5 वर्षात कोणतेही विकास काम केले नाही, असा थेट आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. भोसले यांची लोकसभेतील हजेरी आणि त्यांनी जिल्ह्यातील समस्यांबाबत लोकसभेत उपस्थित केलेले मुद्दे यावरही पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले.
‘उदयनराजेंची दहशत मोडून काढणार’
नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना लक्ष्य करताना त्यांना अनेक महत्वाच्या मुद्दयांवर घेरले. जिल्ह्यातील उदयनराजेंची दहशत मोडून काढणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील वाहनांना टोल मुक्त करणे, पाणी प्रश्न सोडवणे आणि जिल्ह्यातील विकासाची इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्याचेही आश्वासन देत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना कडवे आव्हान दिले.
सातारा मतदारसंघात मागील 5 वर्षात 17 हजार कोटींची कामे
उदयनराजे यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा देताना सातारा मतदारसंघात मागील 5 वर्षात 17 हजार कोटींची मोठी आणि महत्वाची विकास कामे झाल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील पाणी प्रश्न, रोजगार, प्रलंबित विकास कामे यावर उदयनराजे भोसले यांनी भर दिल्याचे पाहायला मिळाले.