सोलापूर लोकसभा मतदारसंघ : सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. इथं भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली.
अखेर या मतदारसंघात भाजपच्या जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी बाजी मारली.
सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार, प्रकाश आंबेडकर यासारख्या दिग्गजांच्या सभा झाल्या.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टरचे सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या वादग्रस्त भाषणाची एक व्हिडीओ क्लिप, सुशील कुमार शिंदेंचं शेवटच्या निवडणुकीबाबतचं आर्जव, प्रकाश आंबेडकर यांच्या रॅलींना मिळणारा तुफान प्रतिसाद यांसारखे मुद्दे सोलापूर लोकसभा निवडणुकीत गाजले.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | सुशिलकुमार शिंदे (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | प्रकाश आंबेडकर (VBA) | पराभूत |
2014 ची लढत
सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला. नवखे असलेल्या शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला. मात्र शरद बनसोडे यांचा मतदारसंघात म्हणावा तितका वावर आणि सुमार कामगिरी यामुळे लोकांमध्ये जशी बनसोडे यांच्यावर नाराजी आहे तशीच पक्षाचीसुद्धा नाराजी होती.
काँग्रेसच्या चाळीस वर्षाच्या गडावर मिळवलेला विजय भाजपाला यंदाच्या निवडणुकीतसुद्धा कायम ठेवायचा आहे. त्यामुळे बनसोडे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देऊन भाजपने सुशीलकुमार शिंदेविरोधात जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवलं.
माझी शेवटची निवडणूक
माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवीय, असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. सोलापुरात आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या निर्धार मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही उपस्थित होते.