वर्धा लोकसभा मतदारसंघ : भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. येथे पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं होतं. इथे यंदा 61.18 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 3.57 टक्क्यांनी घटला होता. या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक लागली होती. या ठिकाणी काँग्रेसकडून माजी राज्यपाल प्रभाराव यांच्या कन्या आणि महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस हे मैदनात होते. या मतदारसंघात दुहेरी लढत होती.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | रामदास तडस (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | चारुलता टोकस (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | धनराज वंजारी (VBA) | पराभूत |
वर्ध्याची जागा भाजपा- काँग्रेससाठी प्रतिष्ठेची
महात्मा गांधी आणि विनोभा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेला वर्धा जिल्हा. वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. हा मतदार संघ 12 वेळा काँग्रेसकडे होता,1 वेळेस कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार विजयी झाला होता, तर तीन वेळेस भाजपाला विजय मिळवण्यात यश आलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत भाजपाने जोरदार मुसंडी मारत मोठ्या फरकाने इथे विजय मिळवला. हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसने माजी राज्यपाल प्रभा राव यांच्या कन्या आणि महिला काँग्रेस प्रदेशअध्यक्ष चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली.
मतदानाच्या टक्केवारीत 3.57 टक्यांनी घट
विधानसभानिहाय 2014 आणि 2019 मतदान टक्केवारी
विधानसभा क्षेत्र 2014% 2019%
धामणगाव(रेल्वे) ६४.५३ ६१.२८
मोर्शी ६६.५७ ६२.५२
आर्वी ६४.९८ ६४.५५
देवळी ६७.३१ ६२.९१
हिंगणघाट ६७.५१ ६३.३७
वर्धा ५८.२६ ५३.५२
एकूण ६४.७५ ६१.१८
2014 च्या लोकसभा निवडणुकीत 1011864 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर 2019 च्या निवडणुकीत 1065778 मतदारांनी मतदान केले.
यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य, कोणाकोणाच्या सभा
वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील,वसंत पुरके, जोगेंद्र कवाडे, यशोमती ठाकूर, कुमार केतकर, रणजीत कांबळे, सचिन सावंत यांच्या सभा घेण्यात आल्या. या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. यात पुलगाव देवळी विधानसभा मतदारसंघात रणजीत कांबळे, आर्वी मतदारसंघात अमर काळे, धामणगाव मतदारसंघात वीरेंद्र जगताप यांच्या सभा झाल्या.
आमदार रणजीत कांबळे हे चारुलता टोकास यांचे मावस भाऊ असल्याने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्याचा चंगच बांधला होता.
तर दुसरीकडे भाजपाकडून अनेक सभांचे आयोजन करण्यात आले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस,पंकजा मुंडे, दिलीप कांबळे, सुधीर मुनगंटीवार, रणजीत पाटील यांच्या सभा घेण्यात आल्या. भाजपाचेही या मतदारसंघात तीन आमदार आहेत. वर्धा विधानसभा पंकज भोयर, हिंगणघाट समीर कुणावार तर मोर्शी वरुड येथे अनिल बोंडे आमदार आहेत.
भाजपच्या रामदास तडस यांना विजयी करण्याकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वर्ध्यात ठाण मांडून बसले होते.
काँग्रेसने वर्ध्यात भाजपाने न केलेल्या आश्वासनांची नागरिकांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. शिवाय जिल्ह्यात झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामातील दर्जा, हायमस्टचा घोळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी हे प्रमुख मुद्दे प्रचारात होते.
भाजपाकडून काँग्रेसचा उमेदवार बाहेरचा असल्याचा प्रचार करण्यात आला.काँग्रेसने 60 वर्षाच्या कार्यकाळात जनतेचा अपेक्षाभंग केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला.
जातीय समीकरणाकडे वळली होती वर्ध्याची निवडणूक
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच जातीय वाद निर्माण झाला होता. वर्धेत भाजपाची उमेदवारी कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना दिली जाणार असल्याची चाहूल लागताच, तेली समजाचे नेतृत्व करणारे भाजपा खासदार रामदास तडस यांनाच उमेदवारी मिळावी याकरिता तेली समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला खासदार रामदास तडस स्वत: उपस्थित होते. त्यावेळी भाजपाने तडस यांना उमेदवारी नाकारल्यास मेघे पिता पुत्राचे पुतळे जाळण्याचं आवाहन करण्यात आलं. आणि इथूनच सुरु झाला जिल्ह्यात तेली -कुणबी वाद.
भाजपाने तेली समजाचे नेतृत्व करणारे रामदास तडस यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने कुणबी समाजाच्या चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली. हा जातीय वाद निवडणुकीदरम्यान मेसेजवार द्वारेही दिसला. तेली समाजाकडून तडस यांना मतदान करण्याचे आवाहन करण्याचा संदेश सोशल मीडियावर झळकत होते. यात कुणबी समाजावर टीका करण्यात आली. या संदेशाला उत्तर देत कुणबी समाजानेही मेसेज वॉर सुरु केलं. यंदाची वर्धा लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्यावर नव्हे तर जातीच्या मुद्यावर होताना दिसली.