कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांचे होणार सुशोभिकरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या ऑनलाईन भूमिपूजन

| Updated on: Aug 07, 2023 | 9:09 PM

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण 12 रेल्वेस्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रीटकरण व सुशोभीकरण आदी कामाचे भूमिपूजन होणार आहे.

कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांचे होणार सुशोभिकरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या ऑनलाईन भूमिपूजन
konkan railway
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : एकीकडे पंतप्रधानांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा पायाभरणी समारंभ नुकताच पार पडला असताना कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाच्या कामाचे उद्या मंगळवार दि. 8 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे. कोकण रेल्वेच्या स्थानकात प्रवासी सुविधा वाढविण्यात येणार आहे. कोकण रेल्वेची स्थानके मूळ गावांपासून लांब असल्याने एसटी सेवेने ती जोडण्याची मागणी होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण 12 रेल्वेस्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रीटकरण व सुशोभीकरण आदी कामाचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी कोकण रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात सामंजस्य करार करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, नितेश राणे, वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कोकणात पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गांचे देखभाल दुरुस्ती आणि परिसरातील सुशोभिकरणाचे काम होणार आहे. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण 37 रेल्वेस्थानके आहेत. त्यापैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या आणि प्रवाशांची सातत्याने वर्दळ असणाऱ्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे काम पहिल्या टप्प्यात होत आहे.

56.25 कोटी रुपयांची तरतूद

रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानके वीर, माणगाव आणि कोलाड, रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी. या कामांना राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. मार्च 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये 12 कामांकरिता 56.25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येत आहेत.

 या प्रवासी सुविधांची उभारणी

रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, रस्त्याच्याकडेला प्रकाश दिवे लावणे, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटर्स बांधणे. महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी, प्रवाशांसाठी स्थानक परिसरात स्टेशन प्लाझा, प्रवाशांसाठी स्थानक परिसरात बस थांबे बांधणे, स्टेशन प्लाझा अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतिक्षालयाची व्यवस्था करणे. ऊन पाऊसापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी व्यवस्था, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याकरीता प्रशस्त मार्ग, दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्षासाठी पार्किंगची व्यवस्था