पुण्यातील खेड-शिवापूर परिसरातून एका गाडीतून 5 कोटींची रक्कम सापडल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच आता जळगावजवळही असाच प्रकार घडला आहे. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील चोपडाई तपासणी नाक्यावर लाखोंची रक्कम सापडली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान तेथ 16 लाख 38 हजार रुपयांची रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांकडून सर्वत्र तपासणी सुरू आहे. याच दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाकडू तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी चोपडाई तपासणी नाक्यावर ही लाखो रुपयांची रक्कम सापडली. त्यावेळी पथकाने कारवाई केली. लाखो रुपयांची ही रक्कम पथकाने उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासमक्ष तहसील कार्यालयात पंचनामा करून जप्त केली.
सापडलेले पैसे हे 10 लाख रुपयांच्या वर असल्याने ती आयकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. दरम्यान हे पैसे ज्या वाहनात सापडले ते एका व्यापाऱ्याची कापसाची रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पुण्यात सापडले होते 5 कोटींचे घबाड
काही दिवसांपूर्वीच पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. त्याच दरम्यान खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली. यावरून राजकारण तापलं होतं. ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर आमदार शहाजीबापू पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हे प्रकरण अजून तापलेले असतानाच आता जळगावमध्येही लाखो रुपये सापडले आहेत.