चंद्रपूर : दारु तस्करांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पीएसआय छत्रपती चिडे प्रकरणात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणातील एकूण 17 जणांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. कुरखेडा येथील शहजाद शेख या मुख्य आरोपीसह 17 जणांवर कारवाई प्रारंभ झाली. नागपूर परिक्षेत्रीय पोलीस महासंचालक एम. प्रसन्न यांनी चंद्रपूर पोलिसांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नुकतेच शासनाने पीएसआय चिडे यांना शहीद दर्जा दिला आहे.
संघटित गुन्हेगारी टोळ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी 1999 साली राज्य सरकारने मोका कायदा अस्तित्वात आणला होता. गेली चार वर्षे चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी अंमलात आली असताना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तीन दारुबंदी जिल्ह्यात काही दारु तस्कर टोळ्या या व्यवसायात सक्रीय झाल्या होत्या. मात्र पीएसआय चिडे यांच्या हत्येनंतर अशा टोळ्या मोडून काढण्याचे मोठे आव्हान चंद्रपूर पोलिसांपुढे उभे ठाकले होते. अशा स्थितीत गुन्हेगारांना आणि दारु तस्करांना वचक बसावा यासाठी चंद्रपूर पोलिसांनी पीएसआय चिडे हत्या प्रकरणातील सर्व 17 आरोंपीवर मोक्कअंतर्गत कारवाई केली जाण्याचा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राच्या महानिरीक्षकांकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून ही कठोर कारवाई चिडे हत्या प्रकरणातील शहजाद शेख या म्होरक्यासह 17 जणांवर लावली जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे अवैध दारू विक्रेत्यांशी लढा देताना मृत झालेले दिवंगत पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना नुकातच राज्या शासनाने शहीदाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या कुटूंबियांना सेवानिवृत्ती पर्यंत अर्थात वयाच्या 58 वर्षापर्यंत संपूर्ण वेतन, नुकसान भरपाईसह अन्य लाभ देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने मृत अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या कुटूंबियांना वेतन आणि देय लाभ मिळण्याची महाराष्ट्रातली ही पहिलीच घटना आहे. नक्षलवादी किंवा दहशतवादी यांच्याशी लढतांना जीव गमावणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना शहिदांचा दर्जा दिला जात होता मात्र दारू तस्करांशी लढतांना जीव गमावणाऱ्या चीडे यांनाही विशेष बाब म्हणून हा दर्जा देण्यात आला आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2008 च्या शासन निर्णयातील तरतुदी लागू होत नव्हत्या, मात्र मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. याआधी मुख्यमंत्री निधीतून 10 लाख रुपयांची मदत चिडे कुटुंबियांना देण्यात आली आहे. या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार असे एकूण 16 लाख रु. ची मदत चिडे कुटुंबीयांना देण्यात आली आहे. त्यांच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित वसतिगृह आणि शिक्षण शुल्क सुद्धा माफ करण्यात आले आहे. चिडे यांच्या मुलाला वयाच्या 18 वर्षानंतर अनुकम्पा तत्वावर नोकरी सुद्धा देण्यात येणार आहे.