Nagpur Violence : नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची प्रॉपर्टी विकणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

| Updated on: Mar 22, 2025 | 2:01 PM

नागपूर राड्याप्रकरणी आत्तापर्यंत 104 आरोपींची ओळख पटली, त्यापैकी 92 लोकांना अटक केली. आरोपींमध्ये काही अल्पवयीन आहेत. दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार. कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची प्रॉपर्टी विकणार आक्रमक भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला.

Nagpur Violence : नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची प्रॉपर्टी विकणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नागपूरमध्ये सोमवारी मोठा हिंसाचार झाला, जमावाने आक्रमक होत दगडफेक केली, तोडफोड केली, पेट्रोल बॉम्बही फेकले. यात कोट्यवधींचे नुकसान झाले. या हिसांचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले, वरिष्ठ पोलीस आयुक्तांशी बैठक घेत त्यांनी सर्व आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधाताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.  दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार. कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या हिंसाचारात ज्यांचं नुकसान झालं त्यांना 3 ते 4 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे ते सगळं मुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल असा थेट इशारा देत फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

नागपूरमध्ये जी घटना झाली, त्याचा संपूर्ण आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त, एसपी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्यासंदर्भातील हा आढावा होता.. मुळातच काही गोष्टी मी सभागृहात स्पष्ट केल्या होत्या. औरंगजेबाची कबर सकाळी जाळण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी तक्रार केली. पोलिसांनी तक्रार घेतली. मात्र, कबर जाळत असताना कुराणचे आयत लिहिलेली चादर जाळली असा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियातून अपप्रचार केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात संध्याकाळी जमाव आला, तोडफोड केली. जाळपोळ केली. लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी चार पाच तासातच या संपूर्ण दंगलीला अटकाव केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेज होते, खाजगी लोकांनी जे मोबाईलवर चित्रीकरण केलं ते असेल पोलिसांनी जे चित्रीकरण केलं, जे दंगेखोर दिसतात त्यांच्यावर अटकेची कारवाई केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश

नागपूर राड्याप्रकरणी आत्तापर्यंत 104 आरोपींची ओळख पटली, त्यापैकी 92 लोकांना अटक केली. आरोपींमध्ये काही अल्पवयीन आहे, 12 लोकं हे 18 वर्षांच्याखालचे आहेत. त्यांच्यावरही कायद्याने कारवाई केली. अजूनही आयडेंटिफिकेोशन सुरू आहे. अजूनही लोक आहेत. त्यांनाही अटक करण्याचा पोलिसांचा मानस आहे. जो व्यक्ती दंगेखोरांना मदत करताना दिसतोय त्याच्यावर कारवाई करण्याची पोलिसांची मानसिकता आहे. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी म्हणून पोस्ट केल्या त्यांना दंगेखोरांच्यासोबत सहआरोपी करणार आहे. त्यांनी दंगा भडकवला. 68 पोस्ट आयडेंटिफाय होऊन डीलिट झाल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेतली जात आहे. ज्यांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवली त्यांच्यावर कारवाई होईल.

3 ते 4 दिवसांत नुकसान भरपाई देणार

ज्यांचं नुकसान झालं, गाड्या फुटल्या, अर्धवट गाड्या फुटल्या त्या सर्वांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल. आता जो काही आपण निर्बंध घातले आहेत. त्यामुळे थोडं जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न राहील. त्याचवेळी पोलीस सजग राहील. कुणी परत असा प्रयत्न केला तर कडक कारवाई केली जाणार आहे. जे नुकसान झालं ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. नागपूरमध्ये ९२ नंतर असा मोठा प्रकार घडला नाही. आता दंगेखोरांना अटकाव केला नाही तर ते सुटतील. त्यामुळे पोलीस कोणताही टॉलरन्स सहन करणार नाही.