राज्यात अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या असून आता नाशिकच्या मालेगावमधून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली आणि जावई यांचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या अपघातामध्ये नात ही गंभीर जखमी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात ही घटना घडली आहे. पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी मुलीज जात होत्या, मात्र त्यांचे शेवटचे दर्शन होण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला असून या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मालेगाव जवळील वाके शिवारात रात्रीच्या सुमारास भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन महिला आणि एक पुरूष अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिघांचा जीव गेला, एक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत, विकास चिंतामण सावंत अशी मृतांची नावे आहेत. तर वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी मुलीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण मालेगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
हे सर्व जण मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत होते. मात्र रस्त्यात त्यांची कार समोर उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की कंटनेनरचा मागचा भाग आणि टाट पंच कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.