सुनील ढगे, गडचिरोली : केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यतची मुदत दिली आहे. बँकेत दर दिवसाला केवळ वीस हजारांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य जणांना मोठा आर्थिक फटका बसणार आहेच. मात्र, यामुळे नक्षली कारवायांचे प्रमाण थंडावण्याची शक्यता आहे. दोन हजारच्या नोटा या नक्षल चळवळीच्या मार्गात अनेक अडथळे आणतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच, नक्षली कारवायांवर आणि नक्षल्यांवर आमची करडी नजर असेल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
दोन हजारांची नोट बंद झाल्यामुळे नक्षल चळवळीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. नक्षलवाद्यांकडे खंडणीच्या माध्यमातून लाखो रुपये येत असतात. मात्र, हे पैसे दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात येत असतात. खंडणीची माध्यमातून आलेल्या नोटा नक्षलवादी जंगलात लपून ठेवतात आणि वेळ लागल्यास त्याचा उपयोग करतात.
खंडणीच्या माध्यमातून येणारा हा पैसा प्रामुख्याने शस्त्रे खरेदी करणे. तसेच, अन्य विघातक दारुगोळा, बॉम्ब बनविणारे साहित्य यासाठी खर्च करण्यात येतो. त्यामुळे त्यांनी लाखो रुपये किमतीच्या 2 हजारांच्या नोटा साठवून ठेवल्या होत्या.
मात्र, आता केंद्र सरकारने 2 हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहे. नक्षलवाद्यांकडे असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी त्यांनी आता शहराकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
छत्तीसगड राज्यात दोन ठिकाणी पोलिसांनी नक्षल समर्थकांना पकडले असून त्यांच्याकडून 6 लाख रुपये जप्त केले आहेत. ही संपूर्ण रक्कम दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होती. या नोटा त्यांनी बँकेत बदलून आणण्यासाठीच आणल्या होत्या. मात्र, त्यांना पकडण्यात आल्याने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यानंतर आणखी एका कारवाईत पोलिसांनी त्यांच्या एका नेत्यालाही अटक केली आहे.
यांनतर पोलिसांनी नक्षलवादी आणि त्यांच्या समर्थकांवर करडी नजर ठेवली आहे. पोलिसांनी बँकासोबत संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली आहे. गडचिरोलीच्या दुर्गम भागात आमची त्यांच्या समर्थकांवर नजर आहे. त्यांच्याकडील नोटा त्यांना बदलता आल्या नाही तर त्यांना त्यांचे ऑपरेशनचे सामान खरेदी करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक मोठ्या शहरात दोन हजारांच्या नोटा बदलायला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर बारीक नजर ठेवली आहे अशी माहिती नक्षल सेलचे डीआयजी संदीप पाटील यांनी दिली.