जळगाव | 15 मार्च 2024 : जळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या बांभोरी गावाजवळ ट्रक आणि क्रुझरची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चौघे जण हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांपैकी काही जण हे ओंकारेश्वर येथे महादेवाची पिंड घेण्यासाठी जाणारे भाविक होते. मात्र ती पिंड आणण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी गावाजवळ वाळूचा ट्रक आणि क्रूझर यांची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी काही जण ओंकारेश्वर येथे महादेवाची पिंड घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांपैकी होते. मात्र त्यांचा अकाली मृत्यू झाला. तुषार जाधव, विजय हिंमतराव चौधरी आणि भूषण सुभाष खंबायत अशी मृतांची नावे असून ते तिघेही जळगावमधील रहिवासी आहेत. तर इतर चौघे जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली असून मोठी गर्दी जमलेली आहे. दरम्यान अपघातग्रस्त ट्रक हा अवैधपणे वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.