शिंदे गटाला अडचणीत आणणाऱ्या अजित पवार गटाच्या 3 अटी, महाराष्ट्राच्या राजकारणात सस्पेन्स वाढला

| Updated on: Oct 04, 2023 | 11:43 PM

पुण्यात जसं झालं तसं नाशिक आणि रायगडमध्ये अजित दादांना करता आलं नाही. अजित पवार यांच्या सत्तेतल्या सहभागानंतर 3 महिन्यांनी पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला. पण, आता उर्वरित मंत्रिमंडळाचा मुहूर्त कधी याकडे इच्छुक आमदारांच्या नजरा आहेत.

शिंदे गटाला अडचणीत आणणाऱ्या अजित पवार गटाच्या 3 अटी, महाराष्ट्राच्या राजकारणात सस्पेन्स वाढला
CM EKNATH SHINDE, DCM AJIT PAWAR, DCM DEVENDRA FADNAVIS AND CHANDRKANT PATIL
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : 4 ऑक्टोबर 2023 | पुण्याच्या पालक मंत्रीपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दादाची वर्णी लावली तर दुसऱ्या दादांची उचलबांगडी केलीय. अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री झालेत. तर पुण्याचे आधीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती अशा दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर, रायगड आणि नाशिकचा मात्र तिढा कायम आहे. दादा रुसले आणि पालकमंत्री पद मिळाले अशी चर्चा सुरु आहे. अशातच आता शिंदे गटाएवढाच आम्हालाही सत्तेत वाटा हवा, अशी अट अजित पवार यांनी ठेवली आहे, अशी माहिती समोर येतेय.

अजितदादा यांनी 28 ऑगस्टला एका पत्रकाराच्या प्रश्नावर तुझ्या तोंडात साखर पडो अशी प्रतिक्रिया दिली होती. आता सव्वा महिन्यातच दादा पुण्याचे पालकमंत्री झाले. पण, हे पालकमंत्रीपद सहजासहजी मिळालेलं नाही. दादा नाराज असल्याचा चर्चेमुळे दिल्लीत हालचाली झाल्यात. यावर पुण्याचे पालकमंत्रीपद बदलण्याबाबत आधीच ठरलं होतं असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल. तर, सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना नाराजीचा फायदा झाला, असा टोला लगावला.

शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यापासूनच, अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. मंगळवारी अजित पवार कॅबिनेटच्या बैठकीला आले नाहीत. त्यानंतर लगेच शिंदे, फडणवीस दिल्लीला गेले. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत शिंदे-फडणवीस यांची अडीच तास बैठक झाली. याच बैठकीत पालकमंत्रीपद आणि उर्वरित मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीतल्या बैठकीत दादांना पुण्याचं पालकमंत्रिपद देण्यावर शिक्कामोर्तब झालं आणि पुढच्या काही तासांतच नव्या पालकमंत्रिपदाची यादी समोर आली. पुण्याचे पालकमंत्रीपद अजित दादांना मिळालं असलं तरी नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्यांचा वाद कायम आहे.

नाशिकच्या पालक मंत्रिपदासाठी अजित दादा गटाकडून छगन भुजबळ इच्छुक आहेत. तिथं शिंदे गटाचे दादा भूसे पालकमंत्री आहेत. तर रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी दादांच्या गटाच्या मंत्री अदिती तटकरे इच्छुक आहेत. मात्र शिंदे गटाकडून भरत गोगावले मंत्रिपदासह रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.

दुसरीकडे शिंदे गटाएवढाच आम्हालाही सत्तेत वाटा हवा, अशी अट अजित पवार यांनी ठेवली आहे. शिंदेंची शिवसेना आणि आम्हाला सर्व ठिकाणी समान वाटप व्हायला हवं. महामंडळ असो किंवा खातेवाटप 25-25-50 हाच फॉर्म्युला हवा. शिंदे आणि आम्हाला 25 तर मोठा पक्ष असल्याने भाजपला 50 टक्के वाटा देण्यात यावा. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर आमचा दावा कायम असणार. रायगडमध्ये आमचा खासदार आहे. त्यामुळे कोकणात एक तरी पालकमंत्रीपद हवं अजितदादा यांची मागणी असल्याची माहिती समोर आलीय.