लग्नसमारंभाचा उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावर, ओठांवर हसून, नवीन कपडे, हातावरची मेहंदी.. सगळी लगबग सुरू असतानाच अचानक काळाने घाला घातला. ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर, वॉटरफॉल पॉईंटजवळ बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 लोक जखमी झाले. त्यांना तातडीने माणगाव ग्रामीण रुग्णालयातच हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आली आहेत. लग्नासाठी ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने जात असताना घाटात हा भीषण अपघात झाला. त्यावेळी बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. बसमध्ये आणखी काहीण जण अडकल्याची भीती व्यक्त होत असून बचाव पथकाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बिरवाडी येथे बसमधऊन लग्नसमारंभासाठी खासगी बसने जात होते. purple ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्रमांक.MH14GU3405) ही रस्त्यावरून जात असताना ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसचा भीषण अपघात झाला. ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 2 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. संगीता धनंजय जाधव , गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार आणि वंदना जाधव अशी मृतांची नावे असून पाचव्या मृत पुरूषाची ओळख अजून पटलेली नसल्याने त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अपघातात 25 लोक जखमी असून काही जण बसमध्येही अडकले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलिसांची त्वरीत कारवाई
या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस, रेस्क्यू टीम, आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमींवर माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या अपघाताप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले दु:ख
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
ताम्हिणी घाटात वऱ्हाडाची बस उलटून झालेल्या अपघातात काही नागरीकांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. अपघातात काहीजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सदर घटनेबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून तातडीने मदत व बचावकार्य सुरू झाले आहे. जखमी व्यक्ती…
— Supriya Sule (@supriya_sule) December 20, 2024