पुण्यातील कल्याणी नगरात आलिशान पोर्शे कारने अल्पवयीन तरुणाने जोरदार धडक मारून मोटारबाईकवरील तरुण आणि तरुणींचा बळी घेतल्याचा ताजा असतानाच विशेष म्हणजे अल्पवयीन तरुणांना कार देऊ नये असा कायदा असतानाही सर्रास तो पायदळी तुडवला जात आहे. आता कल्याण येथे एका तरुणाने बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातही कार चालविणारा मुलगा अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे आलिशान कारने बिल्डरच्या अल्पवयीन पुत्राने दोन तरुणांना चिरडल्याची घटना ताजी आहे. त्यातच कल्याणमध्ये बीएमडब्लू कारच्या बोनेटवर बसून एका तरुणाने केलेली स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे यात बीएमडब्ल्यू गाडी चालवणारा देखील अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात या कार मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कल्याण पश्चिमेत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरुन एक बीएमडब्लू कारच्या बोनेटवर एक तरुण आरामात पहुडलेला दिसला. या तरुणाला कारच्या बोनेटवर आरामात झोपलेले पाहताच रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचारी आणि अन्य वाहन चालकांना धक्का बसला. या बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरुन मस्तपैकी कारच्या राईडचा आनंद घेत होता. या घटनेचा व्हिडिओ काही लोकांनी बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
हा व्हिडिओ व्हायरल होताच बाजारपेठ पोलिसांनी कार मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव शुभम मितालिया आहे. मात्र तो बोनेटवर बसला आणि कारचे स्टीअरिंग त्याने अल्पवयीन मुलाच्या हाती दिले होते. कार चालविणारा मुलगा अल्पवयीन आहे. शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो. तर कार चालविणारा अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्वेत राहतो. ही कार अल्पवयीन मुलाच्या वडीलांची असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली असून पुढील तपास सुरु आहे.