गणेश सोळंकी, बुलढाणा : सिंदखेड राजा (Sindkhed Raja) तालुक्यातील किनगाव राजा (Kingaon Raja) येथील ग्रामदैवत श्री कामाक्षा देवीच्या (kamaksha devi)दरबारात मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सुमारे चारशे वर्षांची धार्मिक परंपरा असणारा हिंदू देवतांच्या सोंगांचा उत्सव सोहळा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला आहे. गावातील सर्वधर्मीय लोक हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्याचबरोबर सगळे भाविक दर्शनासाठी बाहेरुन येतात, मागच्या चारशे वर्षापासून ही परंपरा जपली जात आहे. कोरोनाच्या काळात हा उत्सव साजरा करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु यंदाच्यावर्षी उत्सावाची लोकांनी मजा घेतल्याची माहिती मिळाली आहे.
सुमारे ४०० वर्षांपूवी सिंदखेड राजा येतील राजे लखुजीराव जाधव यांच्या कालखंडात किनगांव राजा येथील गडीवर ग्रामदेवता कामाक्षा देवीची प्रतिष्ठापना केली होती. सर्व जाती धर्मातील व्यक्तींना सोंगांच्या या पवित्र सोहळ्यात मान दिला जातो. या सोंगाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील शेकडो महिला पुरुष व युवक पाहण्यासाठी उपस्थित राहत असतात.
जी व्यक्ती या सोंगासाठी जास्त लिलाव बोलेले, त्या व्यक्तीच्या घरातील सदस्यांना देवीच्या सोंगाचा मान दिला जातो. त्याचबरोबर त्या व्यक्तीला पाच दिवसांचे कडक उपवास देवीचे सोंग घेणाऱ्या व्यक्तींना करावे लागतात. त्यामध्ये नाभिक समाजाचे लोकं लिंबाड्याचे सोंग, यानंतर गणपती सोंग, सरस्वती सोंग, महादेव पार्वतीसोंग, केवळ समाजाची मासोळी सोंग. तसेच रावणताटी सोंग,भस्मासुर बाणासुर आख्यान, श्रीराम दरबार, श्रीकृष्ण राधा या रामायण व महाभारतातील कथाचा सारच यामध्ये असतो. ही सोंगे पाहण्यासाठी परिसरातील हजारोच्या संख्येने नागरिक गर्दी करतात.