पुणे : पुण्यात कोयता गँगच्या तावडीतून एका तरुणीला वाचविणाऱ्या लेजपाल जवळगे याच्यावर सर्वच महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लेजपाल याच्या धाडसाचे कौतुक राज ठाकरे यांनी केले तर, महादेव जानकर यांच्या पक्षाने लेजपाल जवळगे याचे पालकत्व घेतले. लेशपाल याच्या धाडसाचे कौतुक करतानाच जानकर यांनी त्याने यूपीएससीत यश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अतुलनीय धाडसाची दखल घेत लेजपाल जवळगे आणि त्याच्या दोन मित्रांना पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले. तसेच, त्या पीडित तरुणीलाही पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेजपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेश मडावी या जिगरबाज तरुणांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पुण्यातील सारसबाग येथील शिवसेना भवनात पक्ष प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते ही रक्कम या जिगरबाज तरुणांना सुपूर्द करण्यात आली.
पुढील शैक्षणिक परिक्षा देण्यासाठी या आर्थिक मदतीतून त्यांना निश्चित पाठबळ मिळेल असा संदेश मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे असे प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी यावेळी सांगितले. पिडीत तरुणीलाही तिच्या पुढील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. पिडीत तरुणीला मदत करण्यासाठी तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्रालाही पंचवीस हजाराची मदत आणि शस्त्रक्रियेसाठी लागणार संपूर्ण खर्च शिवसेनेच्यावतीने करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिली.
लेजपाल जवळगे आणि त्याच्या मित्रांना ही मदत दिल्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवून महिला सुरक्षा धोरण ठरविण्याची मागणी करण्यात आली.
पुणे शहर शिवसेनेच्यावतीने महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येत असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पुण्यात नोकरीच्या निमित्ताने तसेच अभ्यास करण्यासाठी आलेल्या तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी पोलीस आयुक्तांनी तातडीने उपाययोजना राबवाव्या अशी मागणीही करण्यात आल्याचे डॉ. ज्योती वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेना राज्य सचिव किरण साळी, महिला आघाडी अध्यक्ष लीना पानसरे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.