मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील ‘हिरकणी’ बस राज्यभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे निम आरामदायी श्रेणीच्या या बसेसची नव्याने रूपात आता बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळातील अकरा हजार गाड्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या इलेक्ट्रीक गाड्यांबरोबरच पारंपारिक डीझेल इंधनाच्या गाड्यांची देखील गरज आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने दोनशे हिरकणी बसेसचा आपल्या ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळातील हिरकणी ब्रॅंड पुन्हा नव्या आधुनिक रूपात येणार आहे. पुश बॅक आसनाच्या नव्या 200 हिरकणी बसेसची बांधणी एसटी महामंडळाच्या कारखान्यात होत असून प्रवाशांच्या सोयीसाठी हिरकणी बसेस महत्वाच्या ठरणार आहेत. एसटी महामंडळाने 200 ‘हिरकणी’ बसेसचा आपल्या ताफ्यात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसगाड्यांमध्येही प्रवाशांसाठी ‘पुश बॅक’ आसनांची देखील सोय असणार आहे.
एसटीची हिरकणी बस सन 1982 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. या बसगाड्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या होत्या. त्यामुळे साध्या गाड्यांबरोबरच हिरकणीचीही संख्या वाढविण्यात आली. या बस रातराणी म्हणूनही चालवण्यात आल्या. एसटीच्या ताफ्यात तीनशे हिरकणी या निमआराम श्रेणीच्या बसेस आहेत. हिरव्या आणि निळसर जांभळ्या रंगातही या बसेस सेवा देत आहेत.
एसटी महामंडळात वातानुकूलीत शिवनेरी, शिवशाही आसन आणि शयनयान, अश्वमेध, मिडी यशवंती, इलेक्ट्रीक शिवाई बसेस आहेत. सध्या एसटीच्या ताफ्यात तीनशे ते साडे तीनशे हिरकणी बस असून यापैकी काही बसेस साध्या बसेसमध्ये परार्तित करण्यात आल्या आहेत. एसटी विनावातानुकूलित 700 बस दाखल करणार असून यापैकी 200 बस हिरकणी असतील. एसटी महामंडळ 500 बसेसची बांधणी करणार आहे. त्यानंतर 200 हिरकणी बसची बांधणी करून त्या मार्च 2023 पर्यंत ताफ्यात दाखल केल्या जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
33 पुशबॅक आसने
या बसमध्ये 33 पुशबॅक आसने आहेत. दोन आसनांतील अंतर इतर बसेसच्या तुलनेत जास्त असल्याने प्रवाशांना आरामात बसता येणार आहे. या बसची रंगसंगती हिरकणीसारखीच असणार आहे. सध्या राज्यात एसटीच्या 256 मार्गांवर 500 हून अधिक रातराणी बसगाड्या धावतात. यात साध्या, निमआराम तसेच शयन आणि आसन प्रकारातील रातराणी बस आहेत. नव्या हिरकणीपैकी काही बसेस रातराणी म्हणून चालविण्यात येणार आहेत.