घन घन माला नभी दाटल्या कोसळल्या धारा, मुंबईसह महाराष्ट्रात वादळासह पावसाची धमाकेदार एण्ट्री

| Updated on: Jun 11, 2023 | 9:34 PM

बिपरजॉय चक्री वादळ आणि त्यातच अल-निनोचा परीणाम पावसावर होणार असल्याने महाराष्ट्रावर चिंतेचे ढग जमा झाले होते. त्यातच अरबी समुद्रात बिपरजॉय वादळ धडकल्याने मान्सून लांबणार असे म्हटले जात होते. पण पावसाने आज धमाकेदार एण्ट्री केलीच

घन घन माला नभी दाटल्या कोसळल्या धारा, मुंबईसह महाराष्ट्रात वादळासह पावसाची धमाकेदार एण्ट्री
#mumbairain
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पहात होते. तो पाऊस अखेर वादळी वाऱ्यासह रविवारी सायंकाळी हजर झाला. त्यामुळे घामाच्या धारांमध्ये मुंबईसह कोकण आणि इतर भागातील कातावलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. दरवर्षी नेमाने 6 जूनला बरसणारा मान्सून यंदा उशीराच आला असला तरी येताना तो वादळी वाऱ्यासह आल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात झाडे कोसळणे, तसेच अन्य घटनाही घडल्या आहेत.

दरवर्षी मान्सून 1 जूनला केरळात तर 6 जूनला मुंबईत आणि कोकण परिसरासह राज्यात दाखल होतो. यंदा मात्र अकरा जून उजाडला तरी मान्सून पूर्व आणि मान्सून पावसाचा काहीच थांगपत्ता नसल्याने तोंडचे पाणी पळाले होते. धरणे आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाची पातळी झपाट्याने घटल्याने मुंबई महानगर पालिकेने राखीव पाणी साठा वापरण्याचा निर्णय घेतला होता.

बिपरजॉय गुजरात किनारपट्टीनंतर कराचीत

मुंबईवर चिंतेचे ढग जमा झाले होते. त्यातच अरबी समुद्रात बिपरजॉय वादळ धडकल्याने मान्सून लांबणार असे म्हटले जात होते. तसेच यंदाच्या मान्सूनवर अल निनो चा प्रभाव देखील असणार आहे असे हवामान खात्याने जाहीर केल्याने चिंता वाढली होती. परंतू या सर्व चिंता दूर करीत अखेर पावसाने वादळी वाऱ्याचे संगे आगमन केल्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळाला आहे. हा बिपरजॉय चक्रीवादळाचा जबर प्रभाव दिवसभर मुंबईसह कोकण किनारपट्टीला बसला आहे. परंतू हे चक्रीवादळ आता गुजरात मार्गे कराची बंदरात जाईल असे म्हटले जात आहे.