पुणे : 16 ऑक्टोबर 2023 | पुणे शहरातील स्वामीनारायण मंदिरानजीक नवले पूल येथे भीषण अपघात झालाय. चार वाहने एकमेकांवर आदळून हा विचित्र अपघात झालाय. यातील एका ट्रकने पेट घेतला आहे. अपघातामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी आहे. अजूनही काही जण गाड्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची ४ वाहने, अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नवले पूल येथे हा विचित्र अपघात झाला. सातारावरून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टेम्पो जागीच पलटी झाला. हा टेम्पो समोरून येणाऱ्या ३ वाहनांना धडकला. यामधील एका ट्रकने जागीच पेट घेतला. एकाच वेळी चार वाहनांचा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे सातारावरून मुंबईच्या दिशेने जाणारी एकेरी वाहतूक बंद करण्यात आलीय.
जागीच पलटी झालेल्या टेम्पोमध्ये ६ जण होते. यातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. २ जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. चार वाहनामधील अन्य लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गंभीर अवस्थेत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. घटनेत ज्यांचा मृत्यू झाला ते महिला की पुरुष हे अद्याप समजू शकले नाही.