नाशिक : मासिक पाळी (Menstrual Cycle) सुरु असल्याने एका मुलीला वृक्षारोपण करु दिले नाही. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेत (Devagaon Ashram School) हा धक्कादायक प्रकार घडला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेबद्दल माहिती मिळताच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Chairperson of Women’s Commission Rupali Chakankar ) देखील चांगल्याच संतापल्या आणि या घटनेची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यातच आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. देवगाव आश्रम शाळेत आणखी एक बेजबादारपणाचा प्रकार समोर आला आहे. यामुळे या आश्रमशाळेतील सर्वच शिक्षक अडचणीत येणार आहेत.
नाशिकच्या त्रंबकेश्वर देवगाव मधील आश्रम शाळेत एका महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी आल्याने तिला वृक्षारोपण करू दिलं नाही ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, ही चौकशी करत असताना या देवगाव आश्रम शाळेत आणखी एक बेजबादारपणाचा प्रकार समोर आला आहे. ज्या शिक्षकांवर या आश्रम शाळेत शिकवण्याची जबाबदारी आहे ते शिक्षक शाळा मुख्यालयातच उपस्थित नसल्याच समोर आले आहे.
मुख्यालयात उपस्थित नसलेल्या शिक्षकांना प्रकल्प अधिकारी पहाटे सहा वाजताच शाळेवर दाखल झाल्याचं कळलं आणि या शिक्षकांची पळापळ सुरू झाली. याच धावपळीत शाळे कडे जाणाऱ्या शिक्षकांच्या वाहनाला देवगाव फाट्यावर अपघात झाला, सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी बुंडकुळे, नवले आणि सोनवणे नावाच्या तीन महिला शिक्षिका जखमी झाल्या.
या अपघातामुळे आता या प्रकरणाने नव वळण घेतले आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी या अपघाताची पोलीस ठाण्यात देखील नोंद होणार नाही याची खबरदारीही या शिक्षक महाशयांनी घेतली. त्यामुळे आता आदिवासी आयुक्तालय या प्रकरणाची कशाप्रकारे चौकशी करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर श्रमजीवी संघटनेने या बेजबाबदार शिक्षकांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेत (Devagaon Ashram School) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पावसाळ्यात येथील कन्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनींकडून परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र एका विद्यार्थिनीला शिक्षकांनी झाड लावण्यापासून रोखले. तुझी पाळी सुरु आहे. तू झाड लावलंस तर ते झाड मरेल, असा अजब तर्क या शिक्षकाने लावला. तसे कारण सांगून विद्यार्थिनीला बाजूला ठेवले. घडल्या प्रकाराचा संताप आल्याने सदर विद्यार्थिनीने घरी पालकांना हा किस्सा सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने पालकांच्या सांगण्यावरून आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले आहेत.
मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मनाई करण्याच्या नाशिक मधील घटनेच्या चौकशी करण्याचे आदेश महिला आयोगाकडून देण्यात आले आहे. ही बाब अतिशय निंदनीय असून महराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल घतेली आहे. मनाई करणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.