रायगड : येथील रोहा कोलाड धरणाच्या (Kolad Dam) पात्रात पोहण्याकरिता गेलेल्या तरूणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल (10 जून) रोजी समोर आली. तर पाण्यात बुडून (drowned) दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आसिफ अब्दुल रहमान खान (वय 21) असून याप्रकरणी कोलाड पोलीस स्टेशनमध्ये (Kolad Police Station) नोंद झाली आहे. तर तरूणाचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. तर आसिफच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत कोलाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहा कोलाड येथे (दिनांक 10 जून) पुणे तळेगाव येथील रहिवासी आसिफ अब्दुल रहमान खान हे गेले होते. ते आपल्या कुटुंबासहित कोलाड धरणावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ते येथील धरणाच्या पाण्यात पोहण्याकरिता गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही बातमी कोलाड परिसरात वार्यासारखी पसरली. त्यामुळे स्थानिकांनी धरणाकडे धाव घेतली. तसेच याची माहिती कोलाड पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू केली.
दरम्यान आसिफ अब्दुल रहमान खान हे मिळून आल्याने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना तातडीने डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती आसिफ यांना मृत घोषित केले. यामुळे खान व मेमन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुढील तपास कोलाड पोलीस स्टेशन करीत आहेत.
यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.पवार, पो. दुगडे, अशोक म्हात्रे, सय्यद राऊळ यांनी तपासाच्या दृष्टीने पावले उचलत कार्य केले. तर पोलिसांना स्थानिक ग्रामस्थ हरीश सानप संभे, सल्लाउद्दिन अधिकारी, जिक्रिया करणेकर, संजय कोळी, चंद्रकांत दळवी यांनी मदत केली.