मुंबईत रस्ते कामाच्या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आदित्य ठाकरे उपस्थित आहे. या बैठकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले आहेत. या बैठकीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमनेसामने आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईतील रस्ते कामाच्या बैठकीसाठी येताच सर्व आमदारांनी त्यांचे उभं राहून स्वागत केले. मात्र आदित्य हे खुर्चीवरच बसून राहिले. यानंतर आदित्य ठाकरे हे त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसून एकनाथ शिंदेंना एकटक पाहत होते. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही त्यांच्याकडे पाहिले नाही. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
मुंबईतील रस्त्यांच्या क्राॉक्रीटीकरणाच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अध्यक्षांकडे ही मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रस्ते कामांबाबत चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी रस्ते कामांच्या आढावा घेणारा रिपोर्ट सादर केला. यात त्यांनी टप्पा १ मध्ये २३ टक्के काम झाले. तर टप्पा २ मध्ये ०.५ टक्के काम झाल्याची माहिती दिली. रस्त्यांच्या कामांचा दर्जा; मुदतीत काम पूर्ण होणार का? समन्वयातील अडथळे यावर आमदारांनी लक्ष वेधले. आशिष शेलार यांनीही आपल्या मतदारसंघातील रस्ते कामाबाबत असणाऱ्या समस्या मांडल्या.
येत्या ३१ मे पर्यंत मुंबईतील सुरु असलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. १५ मीटरपेक्षा कमी असणारे, लहान रस्ते सिमेंट क्राँक्रीटीकरण न करता अस्फॉल्ट मध्ये त्यांची कामे करावीत, अशी सूचनाही आमदारांनी केली.