मुंबई: बाबरी मशीद आंदोलनात माझाही सहभाग होता. तेव्हा शिवसेना (shivsena) कुठे होती? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला होता. त्यावर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. 1857च्या लढ्यात त्यांचं खूप योगदान आहे स्वत:च. असो. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा आणि वादात जाण्यापेक्षा राम मंदिर चांगलं होत आहे. कोर्टाने निकाल चांगला दिला. शिवसेनेने संघर्ष केला. चांगलं काम होत आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. आम्ही विकासाची कामं करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण बघितलं नाही. त्यामुळे त्यावर वक्तव्य करता येणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकार प्रत्येक घरोघरी चूल पेटवण्याचं काम करत आहे. विरोधी पक्ष घर पेटवण्याचं काम करत आहे. पण लोकं हुशार आहेत. त्यांनी ओळखून घेतलंय तुम्हीही ओळखून घ्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईत अनेक ठिकाणी आपण चांगले फुटपाथ करत आहोत. जुने प्याऊ रिस्टोअर करत आहोत. बेस्टही तुम्ही पाहात आहात. मुंबईचा आपण विकास करत आहोत. मुख्यमंत्री मुंबईचे आहेत. त्यांचं स्वत:चं लक्ष असतं. सर्व एजन्सी एकत्र काम करत आहे. मुंबईसाठी चांगलं काम करण्याचं काम आम्ही करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबईच्या सोमय्या मैदानावर काल भाजपची पोलखोल सभा पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित केलं होतं. भोंगे उतरवायला ज्यांची हातभार फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली. काय विनोद आहे? बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा. आरोपींच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, स्व. कल्याण सिंग, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, जयभागसिंग पवैया, आचार्य धर्मेंद्र जी यांची नावे होती. या आंदोलनात मीही सामील झालो होतो. तेव्हा शिवसेना कुठे होती? असा सवाल फडणवीस यांनी केला होता.