मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. दादर येथील चैत्यभूमीवर आंबडेकरी अनुयायांच्या गर्दीचा भीमसागर जमा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची शिकवण दिली. त्याची आठवण अजूनही अनुयायांना होत आहेच. पण, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिण्यात आलेल्या ‘आहे कुणाचे योगदान, लाल दिव्याच्या गाडीला’ या गाण्याने एकच धूम उडवून दिली. अवघी तरुणाई या गाण्यावर आज थिरकत असून सोशल माध्यमावर त्याचे निरनिराळे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
१९४५ मध्ये ब्रिटनच्या सरकारने संविधान निर्माण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटीश पंतप्रधान अॅटली यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लॉरेन्स, क्रिप्स, अलेक्झांडर या तीन कॅबिनेट मंत्र्यांना भारतात पाठवले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यांनंतर ही संविधान सभा पूर्णपणे सार्वभौम झाली.
संविधान सभेचे सदस्य भारतातील राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांनी निवडले होते. यात डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. भीमराव आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद यांचा समावेश होता. तर, अनुसूचित जातीतील 30 हून अधिक सदस्यांचा या सभेत सहभाग होता.
सच्चिदानंद सिन्हा हे या बैठकीचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड झाली. डॉ. भीमराव आंबेडकर यांची संविधान समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. 2 वर्षे, 11 महिने, 18 दिवसात भारताचे संविधान तयार झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले.
संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या संविधानामुळेच भारतीय नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य याची हमी मिळावी. बंधुत्वाची प्रेरणा मिळाली. संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदासह आज अनेक महत्वाच्या पदांवर अनुसूचित जाती जमाती, दलित यासारख्या समाजाने दूर लोटलेल्या समाजाला आधार मिळाला, अधिकार मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना देशातील नऊ व्यक्तींना महत्वाचे स्थान दिले. फक्त या व्यक्तींनाच लाल दिव्याची गाडी वापरण्याचे अधिकार दिले. यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सभापती आणि सरन्यायाधीश या केंद्रातील घटनात्मकपदाचा समावेश होता. त्याचसोबत सर्व राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, विधीमंडळाचे सभापती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता.
लाल दिव्याची गाडी मिळणे हे त्याकाळी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. बाबासाहेब यांच्यामुळेच मागास समाजातील काहींना हा मान, पद, प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तरुणाईला ‘आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला’ या गाण्याची आठवण होत होती.
बाबासाहेब यांच्या त्या साऱ्या साऱ्या आठवणीने तरुणाईचे मन भरून येत होते. आज या महामानवाने पुन्हा या देशात अवतार घ्यावा. देशात पुन्हा एकदा एक नवी क्रांती ज्योत चेतवावी अशीच भावना या तरुणाईची होती. सोशल माध्यमावर या तरुणाईने अनेक क्लिप तयार करून या महामानवाला वंदन केले.