Explainer | ‘अब की बार, 400 पार’, लक्ष्य कसे गाठणार? ‘या’ राज्यात भाजप आहे कमजोर

| Updated on: Mar 17, 2024 | 10:28 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच 'अब की बार, 400 पार' चा नारा दिला आहे. मात्र, त्याचे खरे टार्गेट आहे ते म्हणजे 370 जागा जिंकणे. पंतप्रधान मोदी यांच्या या घोषणेनंतर मित्र पक्ष सोबत असूनही भाजप हे लक्ष्य कसे गाठणार याची उत्सुकता आहे.

Explainer | अब की बार, 400 पार, लक्ष्य कसे गाठणार? या राज्यात भाजप आहे कमजोर
LOKSABHA ELECTION
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 17 मार्च 2024 : देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने 2019 मध्ये देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 58 लोकसभा जागांवर आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती. हे नऊ राज्ये म्हणजे गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, चंदीगड आणि दिव दमण आहेत. या नऊ राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. काही राज्यामध्ये मित्र पक्षांचे पाठबळ मिळाले. परंतु, याच मित्र पक्षांमुळे भाजपचे हे टार्गेट कसे पूर्ण होणार याची उत्सुकता आहे. त्यामुळेच भाजपच्या गेल्या लोकसभा निवडणुकीतील राज्यनिहाय कामगिरीवर एक नजर टाकणे गरजेचे आहे.

देशात अशी काही राज्ये आहेत की जिथे भाजपने 90 टक्के जागा जिंकल्या. यामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांचा समावेश आहे. भाजपने येथे एकूण 54 पैकी 52 जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकामध्येही भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष उमेदवारांना पक्षाने पाठिंबा दिला होता. परंतु, 2024 च्या निवडणुकीत भाजपने कर्नाटकमध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) सोबत युती केकी आहे. त्यामुळे 2019 च्या तुलनेत येथे भाजप कमी जागा लढविणार आहे. त्यामुळे क्लीन स्वीप परिस्थिती असूनही भाजपला येथे लोकसभा जागांची संख्या वाढवता येणार नाही.

उत्तर प्रदेशमध्ये काय आहेत समीकरणे?

उत्तर प्रदेशात भाजपने गेल्या निवडणुकीत 80 पैकी 62 जागा जिंकल्या. 2014 च्या तुलनेत गेल्यावेळी भाजपचे नुकसान झाले होते. परंतु, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आता रालोद सामील झाली आहे. त्यामुळे भाजपची कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे. तरी आरएलडी आणि अपना दल यांना जागा द्याव्या लागणार असल्याने भाजप येथे किमान 76 जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपचे चार जागांचे नुकसान होत आहे.

छत्तीसगड आणि झारखंड या राज्यामधील जर सर्व जागा भाजपने जिंकल्या तर 2019 च्या तुलनेमध्ये भाजपच्या पाच जागा वाढू शकतात. तर, आसाममध्ये भाजपने 14 पैकी 10 जागा लढवल्या होता. त्यातील नऊ जागा जिंकल्या. हा फॉर्म्युला असाच राहिला तर आसाम येथून एका जागेचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

मात्र. यातील काही राज्यामध्ये भाजपने स्थानिक पक्षासोबत हातमिळवणी करून काही जागा जिंकल्या होत्या. यात महाराष्ट्र आणि बिहार यांचा सामावेश आहे. 2019 मध्ये भाजपने महाराष्ट्रात 25 जागा लढवून 23 जागा जिंकल्या. तर, बिहारमध्ये 17 पैकी 17 जागा जिंकल्या. या राज्यांमधील जवळपास निम्म्या जागा मित्रपक्षांना मिळाल्या होत्या. वरील राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 266 जागा आहेत. भाजपने कितीही क्लीन स्वीप केले तरी या जागा जास्तीत जास्त 25 इतक्याच वाढू शकतात.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 आणि ओडिशात 21 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनुक्रमे 18 आणि 8 जागा जिंकल्या. या दोन्ही राज्यांत भाजपचे मतदार वाढले ही जमेची बाजू आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता यांनी स्वबळाचा दिलेला नारा हा भाजपच्याच पथ्यावर पडणार आहे. तर, ओडिशात नवीन पटनायक यांच्यासोबत युती झाल्यास भाजपचा वैयक्तिक फायदा मर्यादित होण्याची शक्यता आहे.

दक्षिणेचे आव्हान

2019 च्या निवडणुकीत भाजपला तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. पण, तेलंगणात चार जागांचा फायदा झाला होता. या चार राज्यांमध्ये लोकसभेच्या 101 जागा आहेत.

पंजाबमध्ये लोकसभेच्या 13, मणिपूर, मेघालय आणि गोव्यात प्रत्येकी दोन, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी एक तर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या पाच जागा आहेत. पुद्दुचेरी, लडाख, अंदमान, निकोबार बेटे, दादरा नगर हवेली, लक्षद्वीपमध्ये प्रत्येकी एक जागा आहे. या 32 पैकी भाजपकडे केवळ 7 खासदार आहेत. त्यामुळे भाजपची मदार ही छोट्या छोट्या राज्यावर असणार आहे.