औरंगाबादः माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलांची नावं TET घोटाळ्यात (TET Scam) आल्यानंतर एकानंतर एक धक्कादायक बाबींचा खुलासा होत आहे. सत्तार यांच्या मुलीला 2017 पासून तर आजतागायात पगार मिळत असल्याची माहिती उघड झाली आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख ही मुलगी टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून तिला पगार कसा काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय.. या संदर्भात आता एक वेगळी चौकशी (Investigation) करण्याची गरज असल्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून केली जातेय. शिक्षण विभागांच्या डॉक्युमेंट्स नुसार 2017 पासून ते जुलै 2022 या महिन्यापर्यंत हिना कौसर अब्दुल सत्तार शेख यांनी पगार उचलला आहे.. महिना 40000 पेक्षा जास्त त्यांचा पगार आहे.. खुद्द अब्दुल सत्तार यांनीच त्यांची मुलगी टीटीईटी अपात्र असल्याचं सुरुवातीला माध्यमांना पत्र दिलं. जर त्या अपात्र होत्या तर मग त्या पगार कुठल्या निकषावर उचलतात हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे.. तर शाळेने वेतन बिल सादर केलं त्यात त्या पूर्णतः पात्र असल्याचं दिसतंय आणि म्हणून त्यांचा पगार सुरू असल्याचा खुलासा यावेळी शिक्षण विभागाने केला.
अब्दुल सत्तार यांची 7 मुलं असल्याचं सांगितलं जातं. यात 5 मुली आणि दोन मुलं आहेत. यापैकी हिना, हुमा, उजमा या तीन मुलींची नावे टीईटी घोटाळ्यात निष्पन्न झाली आहेत. समीर आणि अमीर ही दोन मुले आहेत. यातल्या अमीरचे नाव टीईटी घोटाळ्यात असल्याचा आरोप केला जातोय, उर्वरित दोन मुलींची नावे समोर येऊ शकली नाहीत.
टीईटी प्रमाणपत्र हे शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा दिल्यानंतर प्राप्त होतं. हे प्रमाणपत्र असेल तरच शिक्षक म्हणून कार्यरत राहता येतं. हा नियम महाराष्ट्र शासनाने 2013 साली अंमलात आणला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात असंख्य शिक्षकांना बोगस TET प्रमाणपत्र देण्यात आल्याचा घोडाळा उघडकीस आला. पुणे पोलिसांनी या प्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांनाही अटक केली होती. दोन दिवसांपूर्वी 2019 मध्ये झालेल्या TET परीक्षेत 7,800 विद्यार्थी बोगस पद्धतीतून पात्र ठरल्याचं पुण्यातील सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालं. त्यांची यादीही जाहीर करण्यात आली. याच यादीत सत्तारांच्या मुलींची नावं असल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान, TET घोटाळ्याची चौकशी आता ईडीमार्फत करण्यात येणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदार संघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते. सुरुवातीपासून ते मंत्रीपदासाठी महत्वकांक्षी होते. अशोकराव चव्हाण यांच्या सोबत राहून त्यांनी राज्यमंत्री पदी स्वतःची निवड करून घेतली. मात्र 2014 मध्ये काँग्रेस सरकार गेल्यानंतर ते सत्तेबाहेर राहीले. या काळात ते भाजपच्या जवळ गेले. मात्र स्थानिक भाजपने टोकाचा विरोध केल्यामुळे ते शिवसेनेत गेले. शिवसेनेने महाविकास आघाडीत त्यांना महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री पद दिलं. मात्र त्यांनी एकनाथ शिंदे सोबत बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
एकनाथ शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तारांचे TET घोटाळ्याशी कनेक्शन उघड झाल्यानंतर याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. आता तर या घोटाळ्याचा तपास ईडी मार्फत होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता शिंदे आणि भाजप युतीचे सरकार अब्दुल सत्तारांना पाठिशी घालणार का, असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय.