कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्तेबाबत सरकारी पक्षाकडे कोणताही सबळ पुरावा नसल्याने यामधील संशयित आरोपी विरेंद्र तावडे व सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करावे असा केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी शेळके (B.D. Shelake) यांनी फेटाळला आहे. त्यामुळे पानसरे हत्येबाबत ही मोठी घडामोड आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांची हत्या करण्यात आली होती. त्यातील काही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची पुण्यात ऑगस्ट 2013 मध्ये हत्या झाली होती तर त्यानंतर फेब्रुवारी 2015 मध्ये पानसरे यांचीही हत्या (Pansare Murder) करण्यात आली होती. त्यानंतर काही संशयितांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
अॅड. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सबळ पुरावा नसल्याने विरेंद्र तावडे व सचिन अंदूरे यांना दोषमुक्त करावे असा संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी चार महिन्यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश शेळके यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. पण सरकार पक्षातर्फे खटल्यात सबळ पुरावा आणि खटला चालविण्यात पुरावे दाखल केले असल्याने संशयितांचा दोषमुक्त करण्याचा अर्ज न्यायाधीश शेळके यांनी आज, सोमवारी फेटाळला असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूरातील कॉम्रेड गोविंद पानसरे हे नाव सामाजिक, राजकीय, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रीत आदराने घेतले जात होते. लोकशाहीवर प्रचंड निष्ठा ठेऊन त्यांनी कोल्हापूरसह अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माणसांसाठी आवाज उठवला होता. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी विचारांची लढाई विचाराने लढत होते.
जातीय सलोखा निर्माण करण्यापासून ते नेमका इतिहास मांडण्यापर्यंत आणि कोल्हापूरच्या टोल प्रश्नांपासून कामगारांच्या मागण्यांपर्यंत त्यांनी विविध प्रश्नांवर त्यांनी आयुष्यभर लढा दिला.
त्यांचे हत्या होण्याआधी काही दिवसापूर्वी झालेली आंदोलने अलीकडच्या काळात खूप गाजली होती. कोल्हापूरच्या टोल प्रश्नाबाबत त्यांची भूमिका आक्रमक होती. कोल्हापूरात ज्यावेळी शाहू ग्रंथ महोत्सव झाला तेव्हा गोविंदराव पानसरे यांनी नथुराम गोडसे आणि या प्रवृत्तींवर कडाडून हल्ला केला होता.
तर निवृत्त पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी लिहिलेल्या ‘हू किल्ड करकरे’ पुस्तकावर माजी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि गोविंदराव पानसरे यांची भाषणे झाली होती. या कार्यक्रमानंतर पुण्याहूनही पानसरे यांना धमकीची पत्रे आली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यावर गोळीबार होऊन त्यांचा त्यातच मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या