सांगली: सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या बेथेलनगर मधील तीन कोटीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला याची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. सांगलीतील गणेशनगर येथे अज्ञात आरोपींनी पाठलाग करून त्याच्यावर धारदार शास्त्राने वार केले. यामध्ये मैनुद्दीन मुल्ला याचा जागीच मृत्यू झाला. (Accused in robbery murdered in Sangli)
या घटनेनंतर मिरज परिसरात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मैनुद्दीन मुल्लावर वार करून हल्लेखोर फरार झाले. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र, खून नेमकं कोणत्या करणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
सांगली जिल्ह्यातील बेथेलनगर येथून एका झोपडीतुन 2016 साली तीन कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणी मैनुद्दीन मुल्ला याला त्यावेळी अटक झाली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील कडोली येथील, बांधकाम व्यवसायिक झुंजार सरनोबत यांची 8 मार्च 2016 रोजी तीन कोटी अकरा लाख रुपये रक्कमेची चोरी झाली होती. सांगली पोलिसांनी संशयित मैनुद्दीन मुल्ला या चोरट्यास ताब्यात घेतल्यानंतर वारणा नगर चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
वारणानगर येथील वारणा शिक्षण संस्थेच्या इमारतीतील कोट्यवधी रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात वारणा शिक्षण संस्थेच्या इमारतीतील नऊ कोटी रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी चोरीच्या रकमेवर दावा करीत पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली. पोलिसांच्या तपासात मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून अनेक नवे खुलासे झाले. मैनुद्दीनला जामीन मिळाला होता. वारणानगर मधील शिक्षक कॉलनीतून जप्त केलेल्या तीन कोटी अकरा लाखांपेक्षा अधिक मोठी रक्कम पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी मैनुद्दीनशी संगनमत करून वरील रक्कम हडप केल्याचा आरोप झुंझार सरनोबत यांनी केला होता. या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचारी असा सहाजणांविरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांच्या विरोधात चोरीची फिर्याद देणाऱ्या झुंजार सरनोबत यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मैनुद्दीन मुल्ला याने केला होता. याप्रकरणी तिने संरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी काही काळ मैनुद्दीन मुल्ला याला संरक्षणही पुरवले होते.
संबंधित बातम्या:
गाडीवरुन चालताना धक्का लागला, बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत, तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
तुम्ही खरेदी केलेली बुलेट चोरीची तर नाही?
प्रेयसी म्हणाली, म्हातारी माझ्यावर ओरडली, प्रियकराकडून घरात घुसून गेम, नगरमधील थरार
(Accused in robbery murdered in Sangli)