नाशिक | 24 नोव्हेंबर 2023 : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची उद्या 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत संविधान सन्मान रॅली होणार आहे. या रॅलीला हजारो भीम सैनिक आणि प्रकाश आंबेडकर समर्थक एकवटणार आहेत. या रॅलीच्या निमित्ताने आंबेडकर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे या रॅलीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर या रॅलीतून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आंबेडकरांच्या या रॅलीकडे लक्ष लागलेलं असतानाच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. गौरव मोरे यावेळी आंबेडकरांसाठी आवाहन करताना दिसत आहे.
अभिनेता गौरव मोरे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गौरव मोरे हा प्रकाश आंबेडकर यांच्या उद्याच्या रॅलीसाठी आवाहन करताना दिसत आहे. जयभीम,येत्या 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ही रॅली पार पडणार आहे. एक भारतीय नागरिक म्हणून भारतीय संविधानाप्रती असलेलं कर्तव्य बजावू या. आणि 25 नोव्हेंबरला जास्तीत जास्त संख्येने या महारॅलीत समील होऊया. ठिकाण शिवाजी पार्क, दादर, असं आवाहन गौरव मोरेने केलं आहे. गौरवचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीच्या अगोदर 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क, दादर येथे ‘संविधान के सन्मान में’ रॅली आहे. या रॅलीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी राहूल गांधींना निमंत्रण दिलं आहे. राहुल गांधी यांना हे निमंत्रण पाठवलं आहे. राहुल गांधी या रॅलीत येतील, अशी आशा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्याच्या आंबेडकर यांच्या रॅलीत राहुल गांधी येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या रॅलीसाठी आंबेडकर यांनी ठाकरे गटालाही निमंत्रण दिलं आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला या रॅलीचं निमंत्रण नसल्याचं सांगितलं जातं. संविधान वाचवणं हा विषय राजकारणाच्या पलिकडचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर रोजी मसुदा समितीच्या वतीने संविधान सादर केले होते. जाती आणि धर्माचे राजकारण केंद्रस्थानी घेतल्यास राष्ट्राचे स्वातंत्र्य धोक्यात येईल, असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.