लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच आता एका जाहिरातीवरून वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाच्या जाहिराती पॉर्न स्टार असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. मात्र त्यांनी ज्याला पॉर्न स्टार म्हटले तो अभिनेता आता भडकला असून त्याने चित्रा वाघ यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “वॉर रुकवादी पापा” जाहिरातीतील अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी हे चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे संतापले असून त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला. “ मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन ” अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी घेतली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
काय म्हणाला अभिनेता ?
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे . आज त्यांनी माझ्या एका वेबसिरीजच्या भूमेकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी अब्रू नुकसानी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेतो. त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन, असा इशारा अभिनेते राज नयानी यांनी दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला. जे फोटो त्यांनी प्रेस कॉन्फरेन्स मध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सिरीज मधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होता. चित्रा वाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे. केवळ आपल्या राजकीय स्वार्था साठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली आहे, असेही ते म्हणाले. एकंदरच हा वाद आता चांगलाच पेटणार असल्याची शक्यता आहे. त्यावर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे, चित्रा वाघ यांचा आरोप
शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गट हा महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये महिला अत्याचारासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यावरून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. ठाकरे गटाच्या जाहिरातीतील एक माणूस महिला अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न विचारतोय. पण त्याचे ‘उल्लू’ ॲपवरील एका वेबसीरिजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन त्यांनी ( ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली ‘ असा सवाल वाघ यांनी विचारला. महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्न असा किळसवाणा प्रकार आणला जातोय, त्याबद्दल आम्हाला उद्धव ठाकरेंना जाब विचारायचा आहे असंही चित्रा वाघ म्हणाल्या.