नाशिकः एकीकडे आपण पर्यावरण प्रेमी असल्याचे भासवतो. कुठल्याही निमित्ताने झाडे लावण्याचा फार्स करतो. पर्यावरण जतनासाठी वेगवेगळे डे साजरे करतो. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा कृती करायची पाळी येते, तेव्हा सर्रासपणे सारा सद्सदविवेक बाजूला सारून झाडे कापली जातात. विकासाच्या नावाखाली अख्खे डोंगरच्या डोंगर खरवडले जातात. मात्र, याबद्दल तक्रार केली. आवाज उठवला की, हे गरजेचे कसे आहे, हेच पटवून दिले जाते. अगदी असेच नाशिकमध्ये होतोना दिसत आहे. एका उड्डाणपुलासाठी एका 200 वर्षे जुन्या वटवृक्षासह शेकडो झाडांची कत्तल करावी लागणार आहे. मात्र, पर्यावरण प्रेमी आक्रमक झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली असून, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महापालिका आयुक्तांना प्रस्तावित उड्डाणपुलाची पुनर्रचना करण्याची सूचना केली आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिक हे उड्डाणपुलांचे शहर होतेय की काय, असे सध्या तरी दिसते आहे. नाशिकमधील शहरातून जाणारा उड्डाणपूल राज्यभर प्रसिद्ध आहेच. आता सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर दरम्यान एक उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यावरून स्थानिक पातळीवर राजकारणही सुरू आहे. मात्र, आता या उड्डाणपुलासाटी उंटवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पुरातन अशा 200 वर्षांपेक्षाही जास्त वय असणाऱ्या वडाच्या झाडावर कुऱ्हाडीचे घाव पडणार आहेत. इतकेच नाही, तर या कामासाठी एकूण 450 पेक्षा जास्त झाडे कापावी लागणार आहेत. त्यासाठी ब्रह्मगिरी बचाव समिती, म्हसोबा देवस्थान समिती आक्रमक झाली आहे. याबद्दल महापालिकेकडे हरकती नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाकरे यांच्या सूचना काय?
नाशिकमधील उड्डाणपुलासाठी एका जुन्या वटवृक्षासह तब्बल साडेचारशेपेक्षा जास्त झाडे तोडावे लागणार आहेत, ही बातमी आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी याप्रकरणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना या प्रस्तावित उड्डाणपुलाचे डिझाईन बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. तशी माहिती आदित्य यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये आदित्य म्हणतात की, मी नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलाश जाधव यांच्याशी बोललो आणि त्यांना प्रस्तावित उड्डाणपुलाच्या डिझाईनची पुनर्रचना करण्याची विनंती केली. या उड्डाणपुलासाठी एक 200 वर्षे जुने झाड आणि इतर साडेचारशेपेक्षा झाडे तोडावी लागतील. 200 वर्ष जुने वटवृक्ष आणि त्यामधील मंदिराचे जतन करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
I spoke to Nashik Municipal Commissioner Kailash Jadhav ji and requested him to rework the design of the proposed flyover that would currently need to cut a 200 yr old tree and cut 450+ other trees.
The 200 year old Banyan tree and the temple inside it has been saved.— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2022
आयुक्त म्हणाले…
यासंदर्भात महापालिका आयुक्त कैलास जाधव टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा झाडे वाचवण्याबद्दल फोन आला होता. आम्ही त्यांना उड्डाणपुलाचे डिझाईन्स बदलण्यासंदर्भात बोललो. उड्डाणपुलाच्या पिलियर्सच्या जागा बदलू. जास्तीत जास्त झाडे वाचवू. अनेक झाडांचे ट्रान्सप्लान्ट करू. तशा पद्धतीने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. पुरातन 200 वर्षे जुना वटवृक्षही वाचवू. तशा पद्धतीने सारी आखणी करू, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. पर्यावरण मंत्र्यांनी उड्डाणपुलाचे डिझाईन बदलण्याच्या केलेल्या सूचना स्वागतार्ह असून, त्यामुळे शेकडो झाडे तुटण्यापासून वाचणार आहेत, अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींनी दिली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी पुरातन वटवृक्ष आणि इतर झाडे वाचवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसे नियोजन आम्ही करणार आहोत. उड्डाणपुलाच्या पिलियर्सच्या जागा बदलू. जुन्या वटवृक्षासह जास्तीत जास्त झाडे वाचवू. इतर झाडे दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावू.
-कैलास जाधव, महापालिका आयुक्त
असा आहे वटवृक्ष…
-वय : सुमारे 200 वर्षे
-वेढा : 9 मीटर 25 सेंटिमीटर
-पूर्व-पश्चिम विस्तार :42.02 मीटर
-दक्षिण-उत्तर विस्तार : 30.22 मीटर
-आकारमान : 765 मीटर वर्ग
Nashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया?