मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातले चार महत्वाचे प्रकल्प अन्य राज्यात गेल्याचा आरोप केला होता. वेदांता-फॉस्कॉन, एअर बस प्रकल्प, सॅफ्रन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क हे महत्वाचे चार प्रकल्प अन्य राज्यात गेले. हे प्रकल्प अन्य राज्यात जाण्यासाठी शिंदे सरकार जबाबदार असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उद्योग विभागाने श्वेतपत्रिका मांडली. मात्र, याच श्वेतपत्रिकेवरून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारला घेरले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहवालाच्या आधारावर उद्योग विभागाने परराज्यात गेलेल्या त्या चारही बहुचर्चित प्रकल्पांची श्वेतपत्रिका मांडली. यामध्ये महाविकास आघाडी सरकार आणि त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे सरकार या दोन्ही सरकारच्या काळात प्रकल्पासाठी झालेले प्रयत्न नमूद करण्यात आले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी याच श्वेतपत्रिकेवरून शिंदे सरकारला पुन्हा घेरलंय. उद्योग विभागाने जी काही श्वेतपत्रिका मांडली. ती ‘वाईट’ पेपर आहे की ‘काळा’ हे कोणाला समजत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी कामे झाली ती यातून समोर आली आहेत असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार बदलले आणि गद्दार सरकार आले. वेदांतबाबत सर्व गोष्टीच यातुन समोर आल्या आहेत. गद्दार सरकारमधली लोक यांनी आम्ही उद्योग आणायचा प्रयत्न करत आहोत असे सांगितले. पण, ४० गद्दारांना गुजरातमध्ये लपवले याचीच कदाचित ही भेट असेल असा टोला आदित्य यांनी लगावला.
गद्दार सरकारचा अकार्यक्षमपणाच त्यातून दिसून येत आहे. हे लोक हाउसमध्ये खोट बोलतायत की चॅनलवर असा सवाल त्यांनी केला. रायगडचा पालकमंत्री कोण होणार यावर भांडण चालू आहेत. पण, रायगडमधील रोडवरील खड्डे कोणी व्यवस्थित करत नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. त्यांची भाषणे भाजपला हादरवत होती. काॅग्रेस अनेक राज्यात विजयी होणार आहे ही भीती भाजपला आहे. म्हणून त्यांना बोलू द्यायचे नाही असे भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. राहुल गांधी यांनी अजिबात माफी मागू नये. त्यांच्याबाबत कोर्ट जे काही बोलले आहे ते बरोबर बोलले आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात जे काही घडत आहे त्यावर आधी सरकारने लढा दिले पाहिजे. तरूणांना नोकरी द्या. महिलच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. ज्या राज्यात मंत्री महिला खासदारांना शिव्या देतात त्यांच्याकडुन तुम्ही काय अपेक्षा करणार असा टोला त्यांनी लगावला.