नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर येणार आहे. माजी नगरसेवक आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र करत शिंदे गटात (CM Eknath Shinde) प्रवेश केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा प्रथमच नाशिक दौरा होत आहे. नाशिकच्या देवळाली गावात यावेळी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा देखील होणार आहे. याशिवाय नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी नाशिकमध्ये सुरू झाली आहे. खरंतर आदित्य ठाकरे यांची ज्या देवळाली गावात जाहीर सभा होणार आहे. त्याच्याच बाजूला शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांचं गाव आहे.
आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा नियोजित करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाढीकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा देखील होणार आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरा केला होता. त्यावेळी ठाणे आणि नंतर नाशिकमधून आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली होती.
सुरुवातीला ठाकरे गटातून शिंदे गटात फक्त आमदार आणि खासदार गेले होते. त्यामध्ये पदाधिकारी कुणीही न गेल्याने ठाकरे गटाचा बालेकिल्ला शाबूत असल्याचे बोलले जात होते.
मात्र, त्यानंतर माजी नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी यांची मोठी फळीच शिंदे गटात दाखल झाली आहे, त्यावेळी संजय राऊत यांनी नाशिकचे अनेक दौरे करूनही नगरसेवकांना थांबविण्यात यश आले नाही.
त्यामुळे पक्षात खिंडार पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे, आदित्य ठाकरे हे जाहीर सभा घेणार असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
देवळाली गावात आदित्य ठाकरे सभा घेत असतांना तेथील स्थानिक माजी नगरसेविका कै. सत्यभामा गाडेकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे. याशिवाय शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख असलेले लवटे यांचा तो बालेकिल्ला आहे.
त्यामुळे आदित्य ठाकरे शिंदे गटातील खासदार हेमंत गोडसे, लवटे कुटुंब यांच्यासह शिंदे गटात सामील झालेले माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यावर काय हल्लाबोल करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.