उमेश पारिक, टीव्ही 9 मराठी, सिन्नर ( नाशिक ) : नाशिकच्या जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्य दलात सुट्टीवर आलेले जवान गोदावरीच्या उजव्या कालव्यात वाहून गेल्याची घटना ( Sad News ) घडली होती. जवळपास 21 तासांनी त्यांचा मृतदेह हाती लागला आहे. गणेश गिते असं या जवानाचे नाव असून ते विशेष सुरक्षा दलात कार्यरत होते. सुट्टीवर आलेले असतांना गणेश गीते ( army man ganesh gite ) हे दोन्ही मुलांसह पत्नीला घेऊन शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून घरी परतत असतांना पुढे बसलेल्या मुलीचा पाय दुचाकीच्या हँडलमध्ये अडकला आणि गाडीसह ऐन कालव्याच्या ठिकाणी तोल गेला. संपूर्ण कुटुंबच त्यावेळी गोदावरीच्या कालव्यात पडलं.
गणेश गीते यांनी त्यावेळेला कालव्यातून वेगाने पाणी वाहत असतांना सुरुवातीला दोन्ही मुलींना बाहेर काढलं आणि जीव वाचवला. नंतर पत्नी रूपाली यांनाही गणेश यांनी बाहेर ढकललं. पण त्याचवेळी गणेश गीते यांचा श्वास कोंढला आणि ते वाहून गेले.
सीमेवर जीवाशी पर्वा न करता लढणारे जवान गणेश गीते यांनी अखेरच्या क्षणीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुटुंबाला वाचवले. मात्र स्वतःला ते वाचू शकले नाहीत. दोन्ही मुलांसही पत्नीच्या डोळ्यासमोर गणेश गीते नाहीसे झाले.
कुटुंबाने कधी कल्पना सुद्धा केली नसेल, असा प्रसंग गीते कुटुंबावर ओढवला आहे. ही संपूर्ण घटना शिर्डी येथून चोंडी गावाकडे येत असतांना गोदावरीच्या उजव्या कालव्यात घडली आहे. तब्बल 21 तासांच्या प्रयत्नाने त्यांचा मृतदेह हाती लागला आहे.
याच ठिकाणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील भेटीसाठी गेले होते. मात्र, 21 तास होऊनही यंत्रणेला मृतदेह सापडत नसल्याने ग्रामस्थांनी दादा भुसे यांना घेराव घातला होता. त्यामुळे मृतदेह जो पर्यन्त सापडत नाही तो पर्यन्त जाणार नाही असं सांगत थांबण्याची वेळ आली होती.
जवान गणेश गीते यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून गणेश गीते यांच्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. त्यातच अखेरच्या क्षणापर्यन्त गणेश गीते यांनी दिलेला लढा अनेकांच्या मनात घर करून गेला आहे.
गणेश गीते यांचा मृतदेह शोधण्यासाठी तब्बल 21 तास लागल्याने गावकऱ्यांच्या मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. महसूल अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी घटनास्थळी शोध कार्य करत होते. मात्र यश येत नसल्याने गावकरी आणि नातेवाईक संतप्त झाले होते.