मुंबई : महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरचा डीपी बदलल्याचे पहायला मिळाले. शपथविधीनंतर शिंदेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो ट्विटरच्या डीपी (Twitter DP)ला ठेवला आहे. या फोटोमध्ये एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या पायाजवळ बसलेले दिसत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाही सुरवातीला शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे स्मरण केले. यावरुन शिंदे यांची शिवसेना आणि बाळासाहेबांवरील निष्ठा दिसून येते.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात मोठे राजकीय नाट्य घडले. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार अशी चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या घोषणेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तसेच सत्तेबाहेर राहणार अशी घोषणा करणारे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली, ही बाबही राजकीय वर्तुळात तितकीच आश्चर्यकारक होती. एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांनी आपल्याला मोठा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून घोषणा होताच ठाणे, डोंबिवली, एकनाथ शिंदेंचे मूळ गाव सातारा येथे शिंदे समर्थकांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. शिंदे समर्थकांमध्ये एकच आनंदाचं वातावरण पसरले आहे. डोंबिवलीत भर पावसात शिंदे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशे वाजवत जल्लोष केला. यावेळी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच साताऱ्यात आणि कोरेगाव शहरातही कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील पाचवे मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे या गावचे असून या गावात देखील आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावातील ग्रामस्थांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा देखील ग्रामस्थांनी टीव्ही नाईन मराठी सोबत व्यक्त केली होती. सातारचे सुपुत्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे. (After being sworn in as the Chief Minister, Eknath Shinde changed the DP of Twitter)