नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची विरोधकांनी जोरदार खिल्ली उडविली होती. मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेले आणि इकडे राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यावरूनही विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. अयोध्या दौरा उरकून राज्यात परत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. आमचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे असे स्पष्ट करतानाच कुणी काही बोलले तरी आमच्यावर परिणाम होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी यांच्यासह या गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात मुख्यमंत्री शिंदे यांनी बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेत शिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन तात्काळ शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. गारपीट परवा झाली आणि आमचा अयोध्या दौरा परवाच होता. गारपीट होण्याआधी मी इथे यायला हवे होते ? असे विरोधकांना म्हणायचे आहे का ? असा सवाल त्यांनी केला.
विरोधकच नव्हे तर कुणाला काय बोलायचे ते बोलू द्या. त्यांच्या बोलण्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प इतका जबरदस्त केला आणि सर्व समावेशक केला की त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
सरकारला काय बोलके ते त्यांना सुचत नसल्यामुळेच आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांना आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ. त्यासाठीच आज शेतकऱ्यांसाठी इथे आलो. काल प्रभू रामचंद्र यांच्याकडून प्रेरणा घेतली, ऊर्जा घेतली आणि आता कामाला सुटलो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.