मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाचे सरकारमध्ये केवळ वीस मंत्री होते. त्यामुळे काही नाराज आमदारांची मनधरणी करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाले होते. मात्र, आता राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सामील झाल्याने नाराज आमदारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता शिंदे गटाला 9 आणि भाजपला 9 मंत्रीपदे देण्यात आली होतो. तर राष्ट्रवादीच्याही अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता उरलेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिकपणे आलो. आम्हाला वाटलं नव्हतं की राष्ट्रवादी आमच्याबरोबर येईल. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला ‘ते’ जॉईंट होतील असे वाटले नव्हते. त्यामुळे आमचा हिस्सा कमी झाला ते नसते तर आमच्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली असती. मात्र, आता काही लोकांना थांबावे लागेल. नाराज होऊन आता काय करणार जे आहे त्याला सामोरे गेले पाहिजे अशी नाराजी शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी व्यक्त केलीय.
आम्हाला भाकरी खायची होती. पण आता काही जणांना अर्धी भाकर मिळणार. ज्याला अर्धी मिळणार होती त्याला पाव भाकरी मिळणार. आता जे समोर येईल ते पाहू त्याला सामोरे जावे लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जे निर्णय घेतले तो देशहितासाठी राज्यहितासाठी घेतला आहे. तो स्वीकारणे क्रमप्राप्त आहे असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे हे ऑपरेशन सुरू होते म्हणून आम्हाला थांबवले होते. आता ते ऑपरेशन सक्सेस झाले. आता आम्हाला कळलं की राष्ट्रवादीवाले येणार होते म्हणून आम्हाला थांबवण्यात आले होते. त्यावेळी पहिल्या नऊमध्ये आम्ही होतो. त्यावेळी काही कारणामुळे थांबलो आता आमचा नंबर लागेल. मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात व्हायला हवा. ‘आता सर्व झाले, आता जय महाराष्ट्र’, असे भरत गोगावले म्हणाले.
राष्ट्रवादीवाले आमच्याबरोबर आले आहेत त्यामुळे त्यांनी आता आमच्या बाजूला बसायला पाहिजे. मुख्यमंत्री आमचे आहेत, देवेंद्रजी आहेत त्यामुळे काळजी करायचे आम्हाला कारण नाही. उद्धव साहेब होते त्यावेळची बाब वेगळी होती आताची बाब वेगळी आहे. कुणी कोर्टात गेले किंवा आणखी कुठे गेले त्यांना काय करायचे ते करू द्या. जे काही येईल त्याला आम्ही सामोरे जाऊ. आम्ही घाबरणारी मंडळी नाही त्यामुळे त्याची चिंता करायची गोष्ट नाही असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.