मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरविण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. मात्र, त्यापूर्वीच नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या तिकिटावर पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. घोलप यांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भेटीला बोलावले. घोलप यांनी राऊत यांची भेटही घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती घोलप यांनी दिली.
बबनराव घोलप यांनी काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी ‘पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मला संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिली, त्यानंतर मी चांगलं काम केलं. अचानक मला दिसलं, की भाऊसाहेब वाकचौरे हे प्रवेश घेण्यासाठी गेले. भाऊसाहेब वाकचौरे हे गद्दार आहे, त्यांनी पोरांवर केसेस केल्या, असा आरोप त्यांनी केला.
पक्षाचा शिर्डी दुष्काळ दौरा ठरला. त्यावेळी मला सांगितले नाही. दुसऱ्या पदाधिकाऱ्यांवर परस्पर जबाबदारी टाकली. त्या दौऱ्यात मिलिंद नार्वेकर यांनी वाकचौरे यांना पुढे केले. दुसऱ्या दिवशी मला संपर्क प्रमुख पद गेल्याचा फोन आला. त्यामुळे मी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी याचा अभ्यास करावा. तर, संजय राऊत यांचा फोन आला होता, त्यांना भेटायला जाणार आहे, असेही बबनराव घोलप म्हणाले होते.
त्यानंतर आज बबनराव घोलप यांनी मुंबईत सामना कार्यालयात संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना घोळप यांनी सांगितले, ‘तुमचं नेमकं काय आहे ते माझ्याशी चर्चा करा असे संजय राऊत म्हणले होते. त्याप्रमाणे मी त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आहे. या सर्व वस्तुस्थितीबद्दल मी साहेबांशी चर्चा करतो असे त्यांनी मला सांगितले आहे.’
नाशिकमध्ये जो काही प्रकार घडला त्या प्रकाराचा पर्दाफाश झाला पाहिजे. त्याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांच्याकडे केली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होईल. त्यानंतर ते मला कळवतील तेव्हा मी त्यांना भेटणार आहे, असे घोलप यांनी सांगितले.
नाशिक लोकसभेसाठी भाऊसाहेब वाघचौरे यांचे नाव तुम्ही अचानक कसं डिक्लेअर केलं? आधी मला शब्द दिला होता. हे जे काही प्रश्न होते ते मी त्यांना सांगितले आहेत.. त्यांनी मला दोन दिवसांची वेळ दिली आहे. पण, मी अजूनही माझ्या राजीनाम्यावर ठाम आहे. पक्ष सोडून जाईल असे कुठेही वक्तव्य मी केले नाही. ज्या पदावरून मला दूर केले ते पद जाणार असेल ते आता जे पद आहे ते सुद्धा घ्या. मी पक्षांमध्ये शिवसैनिक म्हणून काम करेल असे माझे कालही वक्तव्य होतं आणि आजही आहे, असे घोलप यांनी यावेळी स्पष्ट केले.