मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आता पक्ष संघटनेवर वर्चस्व मिळवण्याची लढाई सुरु झाली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट Action मध्ये आला आहे. दोन्ही बाजूंकडून विविध जिल्ह्यपातळीवरील नेत्यांशी संपर्क साधण्याची मोहीम सुरु झाली आहे. जास्तीत जास्त जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार स्वत: जिल्हा स्तरावरील नेत्यांशी संर्पक साधत आहेत.
शरद पवार यांच्यावतीने जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी आहे. दोन्ही बाजूंकडून पक्षातील नेते, कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जात आहे. काल पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये आपली राजकीय ताकत दाखवून दिली.
कोणासोबत जायचं?
आता अजित पवार यांनी उद्या मुंबईत बॅण्ड्रा येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीतून सर्व चित्र स्पष्ट होईल. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध जिल्ह्यात बैठका सुरु आहेत. कोणासोबत जायचं? यावर विचारमंथन सुरु आहे. पक्षात फूट स्पष्ट असून दोन गट पडल्याच दिसत आहे.
आमचा अभिमन्यू झाला
पुणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. “शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत, तर अजित दादा अर्जुनाच्या रूपात आहेत. आमचा मात्र अभिमन्यू झाला आहे” असं प्रदीप गारटकर म्हणाले.
ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस कुणासोबत?
“पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कोणासोबत जायचं? यावरुन संभ्रमात आहे. नेमका कुणाला पाठींबा द्यायचा? याबाबत बैठकीत निर्णय झालेला नाही. ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणासोबत? याबाबत स्पष्टता नाहीय. जिल्ह्यातील इतर तालुकाध्यक्षाशी चर्चा करुन रात्री पर्यंत निर्णय घेऊ” जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माहिती दिली आहे.
या प्रश्नाच उत्तर देणं कठीण
“काल रात्री या बैठकीचे उशिरा निरोप गेले, त्यामुळे काही जण हजर नाहीत. जिल्हा राष्ट्रवादी म्हणून आम्ही एकत्र आहोत. 4 ते 5 तालुका अध्यक्ष जे आज उपस्थितीत नाहीत, त्यांच्याशी चर्चा केली जाईल. राज्यात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून रात्री निर्णय घेऊ. आम्ही शरद पवार यांचे का अजित पवार यांचे? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे” असं प्रदीप गारटकर म्हणाले.
पुण्याचे पदाधिकारी कुणाच्या बैठकीला जाणार?
“काही आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याची भूमिका ठरवू. उद्या पुणे जिल्ह्यातील लोकं अजित दादा यांच्या बैठकीला जातील तर काही लोकं शरद पवार यांच्या बैठकीला जातील” असं प्रदीप गारटकर यांनी सांगितलं.