मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उठाव केलेल्या आमदारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. शिवसेनेचे ‘सामना’ या मुखपत्रामधूनही एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंत्री, आमदार, नेते त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. ‘सामना’मधून संजय राऊत यांनी सत्ताधारी आणि सहकारी पक्षांवरही टीका करण्यात येते. त्यावरून संजय राऊत यांना प्रत्युत्तरही देण्यात येते. मात्र, आता संजय राऊत यांचा थेट ‘सामना’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे. एकनाथ शिंदे आता हाती ‘कलम’ घेणार आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. लीट पदवी देऊन सन्मानित केले. त्यामुळे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावापुढे ‘डॉ.’ ही पदवी लागली आहे. त्यात आणखी एका पदवीची भर पडली आहे.
गेल्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी वाय पाटील विद्यापीठाने डी.लीट पदवी देऊन सन्मानित केले. डी वाय पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात शिंदे यांना ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल मानद डी. लीट पदवी प्रदान करण्यात येत आहे असे डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते.
डी. लीट पदवीमुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावापुढे आता ‘डॉ.’ अशी पदवी लिहिण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या पदवीत आणखी एका पदवीची भर पडली आहे. ज्यामुळे ते थेट संजय राऊत यांच्याशी सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम 77 टक्के गुणांसह पूर्ण केला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना वृत्तपत्रविद्या आणि जन संज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
ऑगस्ट 2021 मध्ये विशेष प्रावीण्यासह अर्थात 77.25 टक्के गुण मिळवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पाटील, कुलसचिव भटप्रसाद पाटील यांनी प्रमाणपत्र सुपूर्द केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी मुक्त विद्यापीठाची बी. ए. पदवी तसेच मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षण क्रमही विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे.