मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज मोठा झटका बसला. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना ईडीने अटक केली. मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. सुजीत पाटकर आणि डॉ. किशोर बिचुले यांना ईडीने अटक केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुजीत पाटकर यांच्यावर 100 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला होता.
या प्रकरणात याआधी ईडीने त्यांची चौकशी सुद्धा केली होती. त्यांच्या घरावर छापेमारीची कारवाई झाली केली होती. आज अखेर त्यांना ताब्यात घेतलं आहे.
‘संजय राजाराम राऊत याने तयारी करावी’
सुजीत पाटकर यांना अटक होताच भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सुजीत पाटकर हा संजय राऊत यांचा पार्टनर आहे. संजय राऊत हा चोर आहे. सुजीतचा सगळा पैसा संजय राऊतकडे होता. संजय राऊत जास्त दिवस बाहेर राहणार नाही. कैदी नंबर 8969 असेल. संजय राजाराम राऊत याने तयारी करावी” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
‘लूक आऊट नोटीस काढली पाहिजे’
“केंद्र सरकारवर रोज आरोप करायचे. उद्धव ठाकरेंचा कामगार आता आत गेलाय. संजय राऊत हा फरार होऊ शकतो, देश सोडू शकतो. त्यामुळे लूक आऊट नोटीस काढली पाहिजे” अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
‘चोराचा पर्दाफाश होणार’
“संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो. उलटी गिनती सुरू झालीये. कर नाही तर डर कशाला? काही झालं तरी कारवाई होणार चोराचा पर्दाफाश होणार” असं नितेश राणे म्हणाले.