मुंबई : किरीट सोमय्या यांची वादग्रस्त क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपनंतर किरीट सोमय्या यांना विरोधकांनी धारेवर धरलं आहे. काल परवापर्यंत घोटाळ्यांवरून विरोधकांना टार्गेट करणारे किरीट सोमय्या विरोधकांच्या पट्ट्यात आले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. अशात आता या व्हिडीओची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. यानंतर आता किरीट सोमय्या हे देखील मैदानात उतरले आहेत. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. तसेच या संदर्भातलं पत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे.
“माझी व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. असा आरोपांची व्हिडीओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं.
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
या प्रकरणानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळ्यावर पुन्हा एकदा रण पेटवण्यास सुरुवात केली आहे. त्या संदर्भात त्यांनी एक ट्वीट करत माहिती दिली आहे. “जम्बो कोविड सेंटर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट ओक मॅनेजमेंट कन्सल्टन्सीना देण्यासंबंधी फाईलचे आरटीआय अंतर्गत इन्स्पेक्शन झाले. एमएमआरसीएल मुंबई मेट्रो अधिकाऱ्यांशी चर्चा केली.”, असं सांगत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळा,
आज जंबो कोविड सेंटर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सी ना देण्या संबंधी चा फाईल चे RTI अंतर्गत इन्स्पेक्शन केले, MMRCL मुंबई मेट्रो चा अधिकाऱ्यांशी चर्चा केली @BJP4Maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
किरीट सोमय्या यांचा मुद्दा विधीमंडळातही गाजला. शिवसेना नेते आणि विधानपरिषदेतील आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची सखोल चौकशी केली जाईल असं जाहीर केलं आहे.